
भोपाळ: मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली आहे. या विधानाची गंभीर दखल घेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध चार तासांच्या आत एफआयआर नोंदवण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना (DGP) दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सांगितले की, "या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. कायद्याच्या अंमलबजावणीस कोणतीही सवलत नाही." या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या सकाळी होणार आहे.
काँग्रेसकडून देशद्रोहाचा आरोप
काँग्रेसने विजय शाह यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. १४ मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी एफआयआर नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली. तसेच, काँग्रेसने जाहीर केले की १५ मे रोजी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत.
मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही – काँग्रेस
जितू पटवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "विजय शाह यांनी सैन्याचा आणि विशेषतः सैन्याच्या एका महिला अधिकाऱ्याचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांना एक क्षणही मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही." काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहून शहा यांना मंत्रिमंडळातून त्वरित वगळण्याची मागणी केली आहे.