Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये बिलौंजी येथील आमदार शाह यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर महानगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या वाहनातील पाण्याने इनोव्हा कार धुताना दिसत आहेत.
Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल
Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल(Photo-X)
Published on

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे भाजप आमदार रामनिवास शाह यांची खासगी इनोव्हा कार धुण्यासाठी सरकारी अग्निशमन दलाच्या वाहनाचा कथित वापर केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये आमदारांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर महानगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन वाहनाच्या पाईपने कारवर पाणी मारताना दिसत आहेत. या प्रकारामुळे सरकारी साधनसंपत्तीचा खासगी कामासाठी वापर झाल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये बिलौंजी येथील आमदार शाह यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर महानगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या वाहनातील पाण्याने इनोव्हा कार धुताना दिसत आहेत. तीन कर्मचारी अग्निशमन वाहनाला जोडलेल्या पाईपच्या सहाय्याने कारवर पाणी फवारताना दृश्यांमध्ये दिसत आहेत.

VIDEO व्हायरल, विरोधकांचा हल्लाबोल

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकारावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. सरकारी अग्निशमन दलाचे वाहन खासगी कार धुण्यासाठी वापरले गेले का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सरकारी साधनसंपत्तीचा गैरवापर

या प्रकरणावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री पी. सी. शर्मा यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप आमदार आणि नेत्यांकडून महानगरपालिकेच्या साधनसंपत्तीचा कथित गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"या भाजप आमदारांनी आणि नेत्यांनी आधीच महानगरपालिकेच्या साधनसंपत्तीचा गैरवापर केला आहे. आता जे काही बाकी राहिले होते, ते अग्निशमन दलाचे वाहनही त्यांच्या घाणेरड्या वाहनाची धुलाई करण्यासाठी वापरत आहेत," अशा शब्दांत शर्मा यांनी टीका केली.

सरकारी यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांचा खासगी कामासाठी वापर होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

आमदार रामनिवास शाह काय म्हणाले?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, व्हायरल व्हिडीओबाबत विचारले असता रामनिवास शाह यांनी आपल्या गैरहजेरीत नेमके काय झाले, याची माहिती नसल्याचे सांगितले.

"आमदार स्वतःची गाडी स्वतः धुतो का?" असा सवाल करत त्यांनी आधी नेमके काय घडले हे समजून घेतले पाहिजे, असे म्हटले. घटना घडली तेव्हा आपण निवासस्थानी उपस्थित नव्हतो, असा दावा त्यांनी केला.

शाह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या चालकाला गाडी लवकर घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र, अग्निशमन दलाचे वाहन तिथे कोणी बोलावले आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात आला, याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलाचे वाहन कार धुण्यासाठीच वापरण्यात आले होते का, यावर शाह यांनी थेट भाष्य केले नाही. त्याऐवजी शासकीय निवासस्थानी पाणीपुरवठ्याची समस्या असू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या टाकीतून वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाणीपुरवठ्यासाठी हे वाहन आले असावे, असे आपण ऐकले असल्याचे शाह यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या दाव्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

'चालकाला विचारा', आमदारांचा दावा

अग्निशमन दलाच्या वाहनाचा वापर योग्य होता का, असा प्रश्न विचारल्यानंतर शाह यांनी "नेमके काय झाले ते चालकाला विचारा", असे उत्तर दिले.

त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन नेमके कोणाच्या आदेशाने आमदारांच्या निवासस्थानी गेले होते, त्याचा वापर कशासाठी करण्यात आला आणि व्हायरल व्हिडीओतील कार धुण्याचे दृश्य नेमके कशाचे आहे, याबाबत अधिकृत चौकशी होते का, याकडे लक्ष लागले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in