

मंड्या : कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती उक्कडा मंदिरात VIP दर्शनावरून आमदाराच्या मुलीचा आणि महिला PSIचा वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान हा प्रकार घडला. मंदिराच्या गर्भगृहात रांगेत न थांबता प्रवेश करण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर आमदाराच्या मुलीने महिला PSIच्या कानशिलात लगावल्याचे, तर प्रत्युत्तरात पोलिसानेही हात उगारल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मंड्या येथील महिला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI सविता बी. पाटील यांची मंदिरातील बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ऐश्वर्या काही जणांसोबत मंदिरात आल्या. रांगेत न थांबता गर्भगृहात प्रवेश करण्यावरून त्यांचा सविता यांच्याशी वाद झाला.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐश्वर्या आणि सविता यांच्यात वाद होताना दिसत आहे. ऐश्वर्या फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर ऐश्वर्याने सविता यांना कानशिलात लगावल्याचे, तर प्रत्युत्तरात सविता यांनीही तिला मारल्याचे दिसून येते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला.
महिला पोलिसांची तक्रार
सविता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ऐश्वर्याने आपण आमदारांची मुलगी असल्याचे सांगत आपल्याला का रोखले जात आहे, असा सवाल केला. त्यानंतर शिवीगाळ करून कानशिलात लगावली आणि आपल्या नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारीवरून पोलिसांनी ऐश्वर्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, साधी दुखापत, जाणीवपूर्वक अपमान आणि गुन्हेगारी धमकी यांसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल केला आहे.
ऐश्वर्याचीही तक्रार
ऐश्वर्यानेही तक्रार दाखल केली असून संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीतील आरोपांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
'चूक झाली असेल तर माफी मागू'
या घटनेवर आमदार सुरेश गौडा यांनी प्रतिक्रिया देताना, आपल्या मुलीकडून चूक झाल्याचे चौकशीत आढळल्यास तिच्या वर्तनाबद्दल माफी मागण्याची तयारी दर्शवली. दोषी कोणीही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऐश्वर्या दोन लहान मुलांसह मंदिरात गेली होती. मुलांसोबत रांगेत बराच वेळ थांबणे कठीण होऊ शकते, त्यामुळे तिने काही काळासाठी आत जाण्याची परवानगी मागितली होती, असा दावा आमदारांनी केला. मात्र, राजकीय कुटुंबातील सदस्य म्हणून मुलीने अधिक संयम बाळगायला हवा होता, असेही त्यांनी मान्य केले.
व्हीआयपी संस्कृतीला विरोध
मंदिरांमध्ये व्हीआयपींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासही गौडा यांनी विरोध केला. सर्व भाविकांना समान वागणूक देऊन एकाच रांगेतून दर्शनाची व्यवस्था असावी, असे त्यांनी म्हटले. अशा व्यवस्थेमुळे सर्वसामान्य भाविकांची गैरसोय टळेल आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांवरील ताणही कमी होईल, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.