बोलेरो थेट कालव्यात; ११ जणांना जलसमाधी, उत्तर प्रदेशात भीषण अपघात

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रविवारी (दि. ३) सकाळी एक भीषण अपघात घडला. सिहागाव गावातील भाविक जलाभिषेकासाठी पृथ्वीनाथ मंदिराकडे जात असताना त्यांची बोलेरो गाडी कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.
बोलेरो थेट कालव्यात; ११ जणांना जलसमाधी, उत्तर प्रदेशात भीषण अपघात
Published on

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रविवारी (दि. ३) सकाळी एक भीषण अपघात घडला. सिहागाव गावातील भाविक जलाभिषेकासाठी पृथ्वीनाथ मंदिराकडे जात असताना त्यांची बोलेरो गाडी कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.

गाडी ओव्हरलोड झाल्याने घडला अपघात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिहागाव येथील प्रल्हाद गुप्ता आणि त्यांचे नातेवाईक असे १५ जण बोलेरो गाडीतून मंदिराच्या दिशेने निघाले होते. रेहरा गावाजवळ कालव्यालगतचा रस्ता अत्यंत अरुंद आणि निसरडा असल्याने गाडीचा ताबा सुटला आणि बोलेरो थेट कालव्यात कोसळली. गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे प्रवाशांना बाहेर येण्याची संधीही मिळाली नाही.

प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे, की बोलेरो गाडीत प्रवाशांची क्षमता केवळ ८ ते ९ जणांची होती. मात्र, गाडीत तब्बल १५ जण बसले होते. क्षमतेपेक्षा दुप्पट लोक असल्याने गाडीवर अतिरिक्त भार पडला आणि निसरड्या रस्त्यावर तोल गेल्याने अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन, पोलिस अधीक्षक विनीत जयस्वाल, एनडीआरएफ पथक आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत ११ मृतदेह सापडले असून एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेतील मृतांपैकी ९ जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिहागाव गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि रुग्णालयात जमले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलिस अधीक्षक विनीत जयस्वाल यांनी सांगितले की, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले असून जखमींवर त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in