

रोज फुकट मोमो खायला देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलाला स्वतःच्याच घरातील तब्बल ८५ लाख रुपयांचे दागिने आणण्यास स्टॉलचालकाने प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार उत्तर प्रदेशच्या देवरिया शहरातून समोर आला आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने मोमोज खाण्याच्या नादात घरातील तिजोरीवरच हात मारल्याचं उघडकीस आलं आहे.
रोज फुकटात 'मोमो'चे आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विमलेश मिश्रा हे वाराणसीतील मंदिरात पुजारी आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा मोमो खूप आवडीने खातो. हीच गोष्ट जवळच्याच चौकात (देवरिया-कसिया रस्त्यावरील डुमरी चौकात) मोमो स्टॉल चालवणाऱ्या तिघांनी हेरली आणि त्याचा गैरफायदा घेतला. त्या तीन जणांनी अल्पवयीन मुलाला 'फ्री' मोमो देण्याचे आमिष दाखवले आणि हळूहळू त्याला त्या बदल्यात घरातून दागिने आणण्यास प्रवृत्त केले.
घरातून दागिन्यांची चोरी
विमलेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, स्टॉलवरील तिन्ही युवकांनी मुलाला, "घरातून दागिने आणलेस तर मोमोज फ्री मिळतील," असे सांगितले. त्यांच्या बोलण्याला बळी पडून काही दिवसांतच मुलाने घरातील एकामागोमाग एक दागिने चोरून त्या तिघांना दिले.
बहीण भेटायला आली अन्...
माहितीनुसार, हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा विमलेश मिश्रा यांची बहीण घरी भेटायला आली आणि तिने आपले दागिने मागितले. तेव्हा कपाट उघडताच घरातील सर्व दागिने गायब असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. याबाबत मुलाला विचारणा केली असता, त्याने मोमो खाण्यासाठी दागिने मोमो स्टॉलचालकाला दिल्याचे सांगितले. यानंतर विमलेश मिश्रा यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून तिन्ही आरोपींची नावे तक्रारीत नमूद केली आहेत. सध्या चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ₹८५ लाख असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.