

कानपूर : कानपूरमध्ये एका बी.टेक परीक्षेतील सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळवण्यात अपयशी ठरल्याबद्दल वडिलांची माफी मागणारी चिठ्ठी त्याने मागे ठेवली आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
आनंद असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने २०२४ मध्ये ‘पीएसआयटी’ या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात तिसरा क्रमांक मिळवला होता. १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात त्याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद नगरमधील गुजैनी परिसरातील आनंदच्या तीन मजली घरात तो त्याच्या खोलीतील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घराबाहेरून वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांच्या घरगुती कामगाराने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेदरम्यान त्याचे कुटुंबीय त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बिहारला गेले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. तसेच खोलीतून हाताने लिहिलेली पाच ओळींची आत्महत्यापूर्व चिठ्ठी हस्तगत केली.
‘सॉरी पापा, मी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जवळपास ५० वेळा प्रयत्न केला, पण मला यश आले नाही. कृपया मला माफ करा," असे त्या चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शनिवारी संध्याकाळी भैरव घाटावर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
आनंदचे वडील राजकुमार हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते मूळचे बिहारचे आहेत. आनंदने पदवीनंतर ‘पॉवर ग्रिड’मधून एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली होती आणि त्यानंतर तो स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागला होता.
त्याने रेल्वे, बँका आणि शिक्षण विभागाद्वारे घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षा दिल्या होत्या, पण त्याला यश मिळू शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता,’ असे राजकुमार यांनी सांगितले.