बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थीनी परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेवरील QR कोड स्कॅन करताना दिसते. कोड स्कॅन केल्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती न दिसता...
बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video
Published on

सीबीएसई (CBSE) च्या बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर (QR) कोड स्कॅन केल्यावर यूट्यूबवरील म्युझिक व्हिडिओ उघडत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यावर स्पष्टीकरण देत प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत बारावीचा गणित आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्सचा पेपर झाला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवरील डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेला QR कोड स्कॅन केला. स्कॅन केल्यानंतर रिक अ‍ॅस्टलीच्या Never Gonna Give You Up या प्रसिद्ध गाण्याचा व्हिडिओ सुरु होत असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला.

हे गाणे इंटरनेटवर रिकरोल (Rickroll) मीम म्हणून ओळखले जाते. २००० च्या दशकात हा इंटरनेटवरील एक लोकप्रिय प्रँक म्हणून प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये युजर्संना अनपेक्षितपणे या गाण्याच्या व्हिडिओकडे वळवले जाते.

विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थीनी परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेवरील QR कोड स्कॅन करताना दिसते. कोड स्कॅन केल्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती न दिसता यूट्यूबवरील Never Gonna Give You Up या गाण्याचा व्हिडिओ सुरु होत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

यानंतर इतर काही विद्यार्थ्यांनीही काही प्रश्नपत्रिकांच्या सेटमध्ये अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे सांगितले.

CBSEचे स्पष्टीकरण

व्हायरल व्हिडिओनंतर १० मार्च रोजी CBSEने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले. बोर्डाने सांगितले की, प्रश्नपत्रिका पूर्णपणे वैध आणि सुरक्षित आहेत आणि परीक्षेच्या प्रक्रियेवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

CBSEच्या मते, प्रश्नपत्रिकांमध्ये सुरक्षा तपासणीसाठी QR कोडसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे संभाव्य पेपर लीक किंवा गैरप्रकार झाल्यास तपासणी करणे शक्य होते.

बोर्डाने हेही मान्य केले की, काही प्रश्नपत्रिकांच्या सेटमध्ये QR कोड स्कॅन केल्यावर YouTube लिंक उघडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, परीक्षेच्या प्रामाणिकतेवर याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. CBSEने सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून भविष्यात अशी समस्या पुन्हा होऊ नये यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, CBSEच्या बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून त्या १० एप्रिल रोजी 'लीगल स्टडीज'चा शेवटचा पेपर होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in