

नवी दिल्ली : त्रिभाषा धोरणावरून देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट देण्यात आली असून, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एकदाच विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. पालक, विद्यार्थी आणि विविध स्तरांतून झालेल्या विरोधानंतर CBSE ने सोमवारी (दि. २९) सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
CBSE ने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्याने लागू करण्यात आलेल्या त्रिभाषा धोरणाचे पालन करावे लागणार नाही. तसेच, सध्या सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत गेल्यानंतर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नसल्याची माहिती CBSE च्या शैक्षणिक विभागाच्या संचालक प्रज्ञा एम. सिंह यांनी दिली.
नववीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात आधीपासून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच विशेष सवलत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दोन परदेशी भाषा सुरू ठेवण्याची मुभा असेल. मात्र, तिसरी भाषा म्हणून एक भारतीय भाषा शिकणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल.
महिनाभरापूर्वी काय निर्णय झाला होता?
CBSE ने यापूर्वी १ जुलैपासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान दोन भारतीय भाषांसह तीन भाषा शिकणे बंधनकारक करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाविरोधात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. वाढत्या विरोधानंतर आता मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
सहावीपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
एप्रिलमध्ये CBSE ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) सहावीपासून टप्प्याटप्प्याने त्रिभाषा सूत्र लागू करण्याची घोषणा केली होती. याचबरोबर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान विषयांत दोन-स्तरीय (Two-Level) प्रणाली लागू करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला होता.
गणित आणि विज्ञानासाठी दोन स्तर
CBSE च्या नव्या व्यवस्थेनुसार गणित आणि विज्ञान विषयांसाठी स्टँडर्ड आणि ॲडव्हान्स्ड असे दोन पर्याय उपलब्ध असतील. सर्व विद्यार्थ्यांना ८० गुणांची समान परीक्षा द्यावी लागेल. मात्र, विषयाचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त ॲडव्हान्स्ड परीक्षा देता येणार आहे.
२०२८ पासून नवी बोर्ड परीक्षा
CBSE ने यापूर्वी स्पष्ट केले होते की, दोन-स्तरीय प्रणालीअंतर्गत पहिली दहावीची बोर्ड परीक्षा २०२८ मध्ये, म्हणजे २०२६-२७ मध्ये नववीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल.
परदेशी भाषा निवडण्याचे नियमही स्पष्ट
१५ मे रोजी CBSE ने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, विद्यार्थ्यांना परदेशी भाषा तिसरी भाषा म्हणून किंवा अतिरिक्त चौथी भाषा म्हणूनच निवडता येईल. मात्र, त्यासाठी दोन भारतीय भाषा शिकणे आवश्यक असेल.