शर्यतीच्या नादात पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने उडवलं पादचाऱ्यांना; दोघांचा मृत्यू, दोघेजण जखमी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

गुजरातमध्ये कार शर्यतीच्या नादात पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने भर रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवत पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः उडवून दिलं. ही धक्कादायक घटना गुरुवारी भावनगर शहरातील कालियाबीड परिसरात घडली असून, संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या भीषण अपघातात दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
bhavnagar-police-son-speeding-accident
Published on

गुजरातमध्ये कार शर्यतीच्या नादात पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने भर रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवत पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः उडवून दिलं. ही धक्कादायक घटना गुरुवारी भावनगर शहरातील कालियाबीड परिसरात घडली असून, संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या भीषण अपघातात दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन महिलांवर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भगवती सर्कल आणि शक्ती माताजी मंदिर दरम्यान घडली. मृतांमध्ये भार्गव भट्टी (वय ३०) आणि चंपा वच्छानी (वय ६५) यांचा समावेश आहे. दोघेही पादचारी होते. जखमी महिलांना सर टी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मृत भार्गव भट्टी यांचे नुकतेच लग्न झाले होते. ते मधू सिलिका या खाजगी कंपनीत नोकरी करत होते. अपघातावेळी ते कामावर जात होते.

क्रेटा कारचा वेग १२० ते १५० किमी प्रतितास -

अपघातग्रस्त गाडी हरश्राजसिंह गोहिल (वय २०) याने चालवली होती, जो स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्धसिंह गोहिल यांचा मुलगा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हरश्राज आपल्या मित्रासोबत शर्यत करत होता. त्याच्याकडे हुंडई क्रेटा, तर मित्राकडे लाल ब्रेझा होती. क्रेटा कारचा वेग १२० ते १५० किमी प्रतितास होता, असं समजतं.

CCTV फुटेजमध्ये दिसतं की, प्रचंड वेगात आलेली क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना जोरात उडवते आणि नंतर समोरून येणाऱ्या स्कूटरवर धडकते. या धडकेत स्कूटरवरील दोघेही गंभीर जखमी झाले. याशिवाय आसपास उभ्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.

मुलाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन -

अपघातानंतर हरश्राजने वडिलांना फोन करून माहिती दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्धसिंह गोहिल यांनी ही माहिती तातडीने कंट्रोल रूम आणि नीलांबाग पोलिस ठाण्याला कळवली, त्यामुळे रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन मुलाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

प्रारंभी भारतीय दंड संहितेतील कलम १०६ (अ) (निष्काळजीपणे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, सीसीटीव्ही पुराव्यानंतर आता कलम १०६ (हत्या सदृश गुन्हा – गैरजामीनयोग्य, किमान ७ वर्षे शिक्षा) जोडण्यात आलं आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. नागरिकांनी आरोपीवर सामान्य आरोपीप्रमाणे कारवाई व्हावी आणि त्याला कोणतीही सूट न मिळावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in