पैशांसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची उदाहरणं रोज डोळ्यांसमोर येतच असतात. चोरी, फसवणूक, खून यांसारख्या अनेक गुन्ह्यांची मुळं पैशातच दडलेली दिसतात. पण, चेन्नई महानगरपालिकेतील एका साफसफाई कर्मचारी महिलेने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत रस्त्यावर सापडलेली ४५ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग पोलिसांना सुपूर्द केली. या प्रामाणिक कृतीबद्दल तिच्यावर राज्य सरकारसह नेटकऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होतोय.
माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि. ११) चेन्नईतील टी नगर परिसरात घडली. नंगनल्लूर येथील पी. व्ही. नगर परिसरात राहणारे रमेश (वय ४६) हे गेल्या दहा वर्षांपासून जुने सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी ते चेन्नईतील टी. नगर परिसरात एका मित्राला भेटण्यासाठी आले होते. गप्पा मारत असताना त्यांनी दागिन्यांची बॅग जवळच्या हातगाडीवर ठेवली. मात्र घरी परतल्यानंतर त्यांना दागिन्यांची पिशवी विसरल्याचे लक्षात आले.
दरम्यान, थोड्यावेळाने चेन्नई महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी पद्मा या त्याच पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि रस्त्यावर सापडलेली सोन्याचे दागिने असलेली प्लास्टिक बॅग पोलिसांकडे जमा केली. पोलिसांनी पद्मा आणि रमेश यांची चौकशी करून सर्व तपशीलांची पडताळणी केली. टी. नगरमध्ये स्वच्छता काम करत असताना ही पिशवी रस्त्यावर सापडली आणि कोणताही विलंब न करता ती थेट पोलीस ठाण्यात आणल्याचे पद्मा यांनी पोलिसांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
त्यानंतर पोंडी बाजार पोलिसांनी पद्माच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. स्वतः तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही घटनेची दखल घेत स्वतः पद्मा यांची भेट घेतली आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला. पद्मा यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांचे अभिनंदन करत एक लाख रुपयांचा धनादेशही बक्षीस म्हणून प्रदान करत त्यांच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण समाजासमोर ठेवलं.