CJI अवमान प्रकरण : खासदार निलेश लंकेंनी घेतली आरोपी वकिलाची भेट; म्हणाले, ''संविधानाचे रक्षण...

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सोमवारी (दि. ६) वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना अटक केली, मात्र सरन्यायाधीश गवई यांच्या सांगण्यावरून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र,
CJI अवमान प्रकरण : खासदार निलेश लंकेंनी  घेतली आरोपी वकिलाची भेट; म्हणाले, ''संविधानाचे रक्षण...
Published on

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सोमवारी (दि. ६) वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना अटक केली. पण, सरन्यायाधीश गवई यांच्या सांगण्यावरून त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी आज (दि. ९) राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट दिली. या कृतीमागील हेतूबद्दल बोलताना खासदार लंके यांनी स्पष्ट केले की, ''ही भेट समर्थनासाठी नव्हे तर संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देण्यासाठी होती.''

निलेश लंके म्हणाले, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं. या संविधानाचे रक्षण करणारे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्याबद्दल जो अवमान घडला. हा एका व्यक्तीचा अवमान नसून देशाचा अवमान आहे. त्या वकिलांना कुठेतरी संविधानाचा विसर पडला आहे. त्यामुळे अशा कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांना मी संविधानाची कॉपी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देत आहे. हे जे त्यांच्याकडून कृत्य घडलंय ते एका संकुचित भावनेतून, मनुवादी विचारातून घडलेला हा प्रकार आहे.''

तसेच लंके म्हणाले, ''त्या वकिलाचे वय ७० आहे. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा त्यांना गांधीवादी विचारातून समज देणे मला योग्य वाटतं.''

राकेश किशोर यांच्यावर कारवाई

सदर घटनेनंतर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) राकेश किशोर यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांचे तात्पुरते सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जरी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतः गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असला, तरी ऑल इंडिया ॲडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या तक्रारीवरून बंगळुरूतील विधान सौधा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in