

नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’(सीजेपी)कडून शुक्रवार, २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे’, असे आवाहन ‘सीजेपी’ने केले आहे. दरम्यान, शुक्रवारी देशभरात होणारे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, संपूर्ण देशभरात एकाच वेळी आंदोलन करण्यात यावे, असे नमूद करून ‘सीजेपी’ने म्हटले आहे की, या आंदोलनासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घ्याव्यात. तसेच यावेळी सर्वजण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी ‘सीजेपी’कडून करण्यात आलेल्या चार मागण्या सर्वांना वाचून दाखवाव्यात.
आंदोलनस्थळी ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा द्याव्यात, असे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे. सीजेपीने चार प्रमुख मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी यांचा समावेश आहे.
जंतरमंतरवर मोठी गर्दी
दरम्यान, जंतरमंतरवरील गर्दी वाढतच चालली आहे. गुरुवारी सकाळपासून हजारो आंदोलक जंतरमंतरवर जमा झाले. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पार्लमेंट स्ट्रीटवर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांसाठी सकाळच्या चहाची व्यवस्था करण्यात आली होती, लोक सतत खाण्यापिण्याचे सामान पाठवत आहेत. आंदोलनादरम्यान पसरलेला कचरा गोळा केला जात आहे. स्वयंसेवक तो कचरा पिशव्यांमध्ये भरून पाठवत आहेत.
वांगचुक यांची प्रकृती स्थिर
मेदांता रुग्णालयाने गुरुवारी सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. वांगचुक यांच्या उपोषणाचा गुरुवारी २६ वा दिवस आहे. काही खासदार मला भेटायला आले, त्यांनी उपोषण संपवण्याची विनंती केली. मला जर सरकारकडून आश्वासन मिळाले, तर मी आजच उपोषण संपवायला तयार आहे. फक्त सरकारने विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करू नये’असे वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे.
वकिलांचे आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी गुरुवारी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी 'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा' अशा घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत आणि लोकशाही मार्गाने आपली मते व्यक्त करण्याच्या त्यांच्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
दीपके यांच्या आईला झाले दुःख
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना निर्घृणपणे मारहाण होताना पाहून खूप वेदना झाल्या. त्यांनी काहीही चूक केली नसतानाही त्यांना जनावरांसारखी मारहाण करण्यात आली’. त्यांनी सरकारला आवाहन केले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे आणि ताब्यात घेतलेल्यांना लवकरात लवकर सोडावे. जर सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे आधीच ऐकले असते, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती. त्यांनी आंदोलकांच्या संयम आणि शिस्तीचे कौतुक केले.
काँग्रेसकडून ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवासास्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसने देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आले. काँग्रेसकडून ‘छात्रों की गूंज’ याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून २६ जुलैला संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ‘राष्ट्रगीत गायन’ केले जाणार आहे.
चर्चेबाबतचा पेच कायम
कॉकरोच जनता पार्टीसोबत कोणत्याही वेळी चर्चा करण्यास तयार असल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत ‘सीजेपी’ला जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात चर्चा करण्याचा प्रस्ताव चार वेळा देण्यात आला आहे. मात्र, सीजेपीने हा प्रस्ताव फेटाळला. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास म्हणाले, ‘जर सरकारला चर्चा करायची असेल, तर त्यांनी जंतरमंतरवर यावे किंवा तटस्थ ठिकाणी चर्चा करावी. आम्ही कोणाच्याही घरी किंवा कार्यालयात जाणार नाही.