‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप

दिल्लीच्या काँग्रेस रॅलीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील घोषणांवरून संसदेत जोरदार गोंधळ झाला. भाजप-काँग्रेसच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकसभा आणि राज्यसभा कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले.
‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप
‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप
Published on

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी (दि.१४) झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेतील घोषणाबाजीमुळे सोमवारी (दि.१५) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

"मोदी तेरी कब्र खुदेगी...

रविवारी झालेल्या काँग्रेसच्या ‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीत काही कार्यकर्त्यांनी “मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी” अशा घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये काही महिला कार्यकर्त्या घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ११व्या दिवशी भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला.

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी- जे. पी. नड्डा

लोकसभेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी कामकाज सुरू होताच काँग्रेसवर टीका करत, "रॅलीदरम्यान राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते," असा दावा केला. राज्यसभेत केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधानांच्या मृत्यूची कामना करणाऱ्या घोषणांना 'लज्जास्पद' ठरवत "राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी," अशी मागणी केली.

दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गोंधळ

तर लोकसभेत किरेन रिजिजू म्हणाले, “१.४ अब्ज भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारच्या घोषणा होणे अत्यंत दुर्दैवी आहे.” या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गोंधळ झाला. सकाळी ११ वाजता सुरू झालेले कामकाज अवघ्या काही मिनिटांतच तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत, तर नंतर पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले होते.

भाजपलाच माहिती नाही की...

दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वड्रा यांनी भाजपचे आरोप खोटे ठरवले. त्या म्हणाल्या, “ही घोषणा कोणी दिली हे आम्हाला माहिती नाही. व्यासपीठावरून कोणीही असे वक्तव्य केलेले नाही. भाजपलाच माहिती नाही की या घोषणा कोणी दिल्या.” या रॅलीतील घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये जयपूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंजू लता मीणा यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, "मतदानातील कथित गैरव्यवहाराबद्दल जनतेमध्ये असलेला संताप व्यक्त करण्यासाठीच या घोषणा दिल्या गेल्या.

काँग्रेसच्या रॅलीतील घोषणांवरून संसदेत निर्माण झालेल्या या वादामुळे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळातच झाल्याचे चित्र आहे.

logo
marathi.freepressjournal.in