
नवी दिल्ली : लोकसभेत राज्यघटनेवरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मणिपूर आणि संभल हिंसाचाराबाबत मोदी निर्विकार असून त्यांना राज्यघटना म्हणजे संघ परिवाराच्या नियमावलींचे पुस्तक नाही, याची जाणीव झालेली नाही, असे त्या म्हणाल्या.
घटना म्हणजे न्याय, ऐक्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची ढाल आहे. मात्र भाजपने गेल्या १० वर्षांत ती तोडण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. मोदी घटनेवर माथा टेकवतात, मात्र जेव्हा संभल, मणिपूर आणि हाथरसबाबत न्याय देण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही दिसत नाही, असा हल्ला प्रियांका यांनी आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात चढविला.
घटना म्हणजे भारताचे संविधान आहे ते संघाचे विधान नाही हेच मोदी यांना समजलेले नाही, असे वाटते. खासगीकरणाच्या माध्यमातून सरकार आरक्षण धोरण कमकुवत करीत आहे. त्यांना हवे तसे लोकसभा निवडणुकीचे निकाल आले नाहीत, अन्यथा त्यांनी घटना बदलण्यासाठी पावले उचलली असती, असेही त्या म्हणाल्या.
जनतेला जातनिहाय जनगणना हवी आहे आणि निवडणूक निकालामुळे सत्तारूढ पक्षही त्याबाबत भाष्य करीत आहे. संपूर्ण विरोधी पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करीत असताना सत्तारूढ पक्ष गुरे आणि मंगळसूत्र चोरीला जाण्याबाबत भाष्य करीत आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.
देशात भीतीचे वातावरण
देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना प्रियांका म्हणाल्या की, आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी-कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यमातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विरोधकांना तुरुंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणाला सोडले नाही. यांनी देशातील वातावरण भीतीने भरून टाकले आहे. यांची मीडियाची मशीन खोटी माहिती पसरवते आणि वेगवेगळे आरोप करते. पण कदाचित ती देखील भीतीखालीच जगत आहे, असे त्या म्हणाल्या.
राजाकडे हिंमत नाही...
सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे टीका ऐकून घेण्याची हिंमत नसल्याचेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिले. त्या म्हणाल्या की, एक गोष्ट सांगितली जात असे की, राजा वेषांतर करून बाजारात टीका ऐकण्यासाठी जात असे. प्रजा माझ्याबद्दल काय बोलतेय, मी योग्य मार्गावर चालतोय की नाही, हे ऐकण्यासाठी राजा बाजारात जात असे. पण आजचा राजा वेषांतर तर करतो. वेषांतर करण्याचा त्यांना शौक तर आहे, पण त्यांच्याकडे ना लोकांमध्ये जाण्याची हिंमत आहे, ना टीका ऐकून घेण्याची, असा टोला प्रियांका गांधी यांनी मोदींचे नाव न घेताच लगावला.
सर्व जबाबदारी नेहरूंचीच आहे का?
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाजपकडून सातत्याने हल्ले होत असल्याचा उल्लेख प्रियांका यांनी केला. आपल्या भाषणात प्रियांका यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. नेहरू यांचे नाव क्रमिक पुस्तकातून तुम्ही काढून टाकू शकता, परंतु भारताच्या स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान तुम्हाला पुसून टाकता येणार नाही. सत्तारूढ पक्ष सातत्याने संसदेत भूतकाळाचा उल्लेख करतात, वर्तमानात काय चालले आहे ते पाहा, तुम्ही काय करीत आहात, तुमची जबाबदारी काय आहे, सर्व जबाबदारी केवळ नेहरू यांचीच आहे का, असा सवालही प्रियांका यांनी केला.
राहुल यांच्याकडून प्रियांकांची स्तुती
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी लोकसभेत प्रथमच भाषण केले. त्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कौतुक केले. आपल्या पहिल्या भाषणाहून प्रियांका यांचे पहिले भाषण अधिक उत्तम होते, असे राहुल म्हणाले.