

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्समध्ये करण्यात आलेल्या एका वर्षाच्या व्यापक, शवविच्छेदनावर आधारित निरीक्षणात्मक अभ्यासात कोविड-१९ लसीकरण आणि तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यू यांचा कोणताही वैज्ञानिक संबंध आढळलेला नाही. या निष्कर्षांमुळे कोविड लसी सुरक्षित असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर अचानक मृत्यू होत असल्याच्या वावड्या देशात उठवल्या होत्या. त्यामुळे याबाबतचा अभ्यास करायला ‘एम्स’ने अभ्यासगट नेमला होता. हा अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख नियतकालिक ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला आहे.
अभ्यासानुसार, तरुणांमधील अचानक मृत्यू ही गंभीर चिंतेची बाब असून त्यासाठी लक्ष केंद्रित सार्वजनिक आरोग्य धोरणांची गरज आहे. यामागे मुख्य कारण म्हणून अंतर्निहित कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) आढळून आली असून, श्वसनाशी संबंधित तसेच अस्पष्ट मृत्यूंच्या कारणांचा अधिक सखोल तपास आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनात अचानक मृत्यू झालेल्या प्रकरणांचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले. यात व्हर्बल ऑटोप्सी, मृत्यूनंतरची इमेजिंग, पारंपरिक शवविच्छेदन आणि ऊतक-रोगविज्ञान (हिस्टोपॅथॉलॉजी) तपासणीचा समावेश होता. हे सर्व बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाद्वारे करण्यात आले.
एका वर्षाच्या कालावधीत १८ ते ४५ वयोगटातील प्रौढांमधील अचानक मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. तरुणांमधील अचानक मृत्यू आणि कोविड-१९ लसीकरण स्थिती यांच्यात कोणताही सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आढळला नाही, असे अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यासानुसार, तरुणांमधील मृत्यूंचे सर्वाधिक कारण हृदयविकाराशी संबंधित होते. त्यानंतर श्वसनाशी संबंधित कारणे आणि इतर गैर-हृदयविकाराची कारणे होती. कोविड-१९ आजाराचा इतिहास आणि लसीकरण स्थिती तरुण व ज्येष्ठ वयोगटांमध्ये तुलनात्मक आढळली आणि कोणताही कारणात्मक संबंध ओळखला गेला नाही.
हे निष्कर्ष कोविड-१९ लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे अधोरेखित करणाऱ्या जागतिक वैज्ञानिक पुराव्यांशी सुसंगत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
एम्सचे प्राध्यापक डॉ. सुधीर अरवा यांनी सांगितले की, कोविड-१९ लसीकरण आणि अचानक मृत्यू यांचा संबंध दर्शवणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या दावे आणि अप्रमाणित अहवालांच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासाचे प्रकाशन विशेष महत्त्वाचे आहे. या निष्कर्षांमधून असे दावे समर्थित होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि सार्वजनिक समज व चर्चेसाठी वैज्ञानिक, पुराव्याधारित संशोधनच मार्गदर्शक असावे, यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, तरुणांमधील अचानक मृत्यू दुर्दैवी असले तरी ते अनेकदा कधी कधी निदान न झालेल्या वैद्यकीय स्थितींशी संबंधित असतात. त्यामुळे लवकर तपासणी, जीवनशैलीत बदल आणि वेळेवर वैद्यकीय उपचार यांसारख्या लक्ष केंद्रीत सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची आवश्यकता आहे.
हा अभ्यास मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत एम्स, दिल्ली येथील पॅथॉलॉजी तसेच फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी विभागांमध्ये करण्यात आला. अचानक मृत्यूच्या व्याख्येत बसणारी प्रकरणे समाविष्ट करण्यात आली.
१८ ते ४५ वयोगटातील तरुण प्रौढ आणि ४६ ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ प्रौढ यांच्यातील अचानक मृत्यूंची तुलनात्मक विश्लेषण करण्यात आली. शवविच्छेदन केलेल्या २,२१४ प्रकरणांपैकी तरुणांमधील अचानक मृत्यूंचे प्रमाण ४.७ टक्के होते. तरुण प्रकरणांचे सरासरी वय ३३.६ वर्षे असून पुरुष-स्त्री प्रमाण ४.५:१ होते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
विश्वासार्ह स्रोतांवर अवलंबून राहावे
डॉ. अरवा यांनी पुढे म्हटले, ‘नागरिकांनी विश्वासार्ह वैज्ञानिक स्रोतांवर अवलंबून राहावे आणि सिद्ध सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांवरील जनतेचा विश्वास कमी करणाऱ्या चुकीच्या माहितीपासून दूर राहावे.’