कोविड लसीकरण सुरक्षित, अचानक मृत्यूचे कारण वेगळेच; आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

कोविड लसीकरण सुरक्षित, अचानक मृत्यूचे कारण वेगळेच; आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

देशभरात कोविड-19 लसीकरणानंतर काही तरुण आणि प्रौढ व्यक्तींमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः कर्नाटकमध्ये अलीकडच्या काळात अशा मृत्यूंची वाढती संख्या पाहायला मिळाली. यामुळे कोविड लसीकरण आणि अचानक मृत्यू यांचा संभाव्य संबंध चर्चेचा विषय ठरला होता.
Published on

देशभरात कोविड-19 लसीकरणानंतर काही तरुण आणि प्रौढ व्यक्तींमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः कर्नाटकमध्ये अलीकडच्या काळात अशा मृत्यूंची वाढती संख्या पाहायला मिळाली. यामुळे कोविड लसीकरण आणि अचानक मृत्यू यांचा संभाव्य संबंध चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टपणे भूमिका मांडत म्हटले आहे, की कोविड लसीकरण आणि अचानक होणाऱ्या मृत्यूमध्ये कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही.

कर्नाटकमधील मृत्यूंची गंभीर दखल

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात गेल्या महिन्यात २० पेक्षा अधिक लोकांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही १९ ते ३२ वयोगटातील तरुणही होते. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉ. रवींद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी १० दिवसांत अभ्यास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही कोविड लसीला घाईघाईने मान्यता देण्याचे परिणाम मृत्यूंशी संबंधित असू शकतात, असे सूचित केले होते. जगभरातील काही संशोधनातून अशा शक्यतेकडे इशारा देण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला होता. १ जुलै रोजी 'X'वर सिद्धरामय्या यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यामुळे २ जुलै रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले.

केंद्र सरकारचा अभ्यास आधारित निष्कर्ष

यावर आरोग्य मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण देताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी केलेल्या अभ्यासांचा हवाला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतामधील कोविड लसी पूर्णतः सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहेत, असे म्हंटले आहे.

दोन स्वतंत्र अभ्यास

ICMR-राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्था (NIE) च्या बहुकेंद्रित अभ्यासात १८ ते ४५ वयोगटातील मृत्यूंची कारणमीमांसा करण्यात आली. यात स्पष्ट निष्कर्ष देण्यात आला की, कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढत नाही.

दुसरा अभ्यास AIIMS, नवी दिल्ली आणि ICMR यांनी एकत्रितपणे सुरू केला आहे. त्यात असे निष्कर्ष समोर आले की, तरुणांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फेक्शन - MI) हे आहे. काही प्रकरणांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन देखील संभाव्य कारण म्हणून नोंदवण्यात आले आहे.

दिशाभूल करणारे दावे खोटे

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, अंतर्निहित आजार, धोकादायक जीवनशैली आणि अनुवंशिक कारणे हीच अचानक मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे "कोविड लसीमुळे अचानक मृत्यू होतो" हे दावे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे वैज्ञानिक तज्ज्ञांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे की, कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे आणि त्यामागे वैज्ञानिक आधार असून त्याचा मृत्यूशी कोणताही थेट संबंध नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी संशोधनावर आधारित धोरणे राबवली जात आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in