दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये तसेच डोंगराळ भागात भीषण हानी केली आहे. मिरिक परिसरात पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला
Published on

गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये तसेच डोंगराळ भागात भीषण हानी केली आहे. मिरिक परिसरात पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुडिया लोखंडी पूल कोसळल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला असून मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर देखील परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीचा तुकडा कोसळल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

कुर्सियांगजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११० वर हुसेन खोलाजवळ मोठे भूस्खलन झाले असून रस्त्याचा मोठा भाग चिखल आणि ढिगाऱ्याखाली गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये वाहनं रस्त्यात अडकलेली आणि रस्ता पूर्णपणे खचलेला दिसत आहे.

दुडिया पूल कोसळला

मिरिक आणि कुर्सियांग दरम्यानचा महत्त्वाचा दुडिया लोखंडी पूल वाहून गेल्याने, या दोन्ही शहरांदरम्यानचा संपर्क पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे पर्यटन क्षेत्र आणि प्रमुख शहरे यांच्यातील दळणवळण खंडित झाले असून मदत पथकांना घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले आहे.

रेड अलर्ट कायम

भारतीय हवामान विभागाने (IMD) दार्जिलिंग, कालिम्पोंग, जलपाईगुडी, कूचबिहार आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. IMD च्या अंदाजानुसार, उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पुढील २४ तासांत अत्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, झारखंडच्या पश्चिमेकडून आणि बिहारच्या दक्षिणेकडून येणारा कमी दाबाचा पट्टा या पावसाचे प्रमुख कारण आहे.

दक्षिण बंगालमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि नादिया जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे, तर दक्षिण बंगालच्या बहुतेक भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत बांकुरा येथे ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

भूस्खलनामुळे रस्ते आणि पूल कोसळल्याने एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यात अडचणींना सामोरे जात आहेत. मलबा हटवण्याचे आणि प्रभावित गावांशी संपर्क पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर जाणे टाळण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

पर्यटन क्षेत्रावर परिणाम

दार्जिलिंग आणि मिरिक हे बंगालमधील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. पूल आणि रस्ते कोसळल्यामुळे अनेक पर्यटक अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे आणि बस वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in