पोलिसाच्या मुलाला कॉपी करताना पकडलं; संतप्त वडिलांनी कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांनाच कानफडलं, VIDEO व्हायरल

डेहराडूनमधील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्याच्या पोलिस वडिलांनी शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसाच्या मुलाला कॉपी करताना पकडलं; संतप्त वडिलांनी कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांनाच कानफडलं, VIDEO व्हायरल
Published on

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेदरम्यान कॉपी केल्याप्रकरणी मुलाला जाब विचारल्यानंतर एका पोलिस उपनिरीक्षकाने सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

४ जून रोजी पिथुवाला येथील शासकीय पॉलिटेक्निक संस्थेत अंतिम वर्षात शिकणारा कबीर कंडवाल हा विद्यार्थी परीक्षेदरम्यान इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे निरीक्षकांच्या निदर्शनास आले. यानंतर शिक्षकांनी त्याला जाब विचारत लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले. महाविद्यालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यावेळी विद्यार्थ्याने त्याचे वडील पोलिस अधिकारी असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गोंधळ

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याचे वडील, उपनिरीक्षक महेश कंडवाल कॉलेजमध्ये आले. महाविद्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यांनी परीक्षा नियंत्रण कक्षात घुसून शिक्षकांशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली, मालमत्तेचे नुकसान केले आणि काही शिक्षकांना मारहाणही केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खुर्च्या फेकल्याचे आणि परिसरात गोंधळ झाल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल; अधिकाऱ्यावर कारवाई

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डेहराडूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. शैक्षणिक संस्थेत गैरवर्तन केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विद्यार्थ्याचाही दावा

दरम्यान, विद्यार्थ्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने कॉपी केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काही शिक्षकांनी पैसे मागितल्याचा आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, या आरोपांची अद्याप पुष्टी झालेली नसून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

दोन्ही बाजूंकडून तक्रारी

निलंबित पोलिस अधिकाऱ्यानेही चार शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in