दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

दिल्ली विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटने स्पाइसजेट प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रांगेतील वादातून घडलेल्या घटनेनंतर पायलटला कामावरून काढण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई
दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई
Published on

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ वर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटने स्पाइसजेटच्या प्रवाशाला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रांगेत पुढे जाण्यास विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचा दावा प्रवाशाने केला असून, ही घटना त्याच्या लहान मुलांसमोर घडल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित प्रवासी अंकित देवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती देत आपल्या चेहऱ्यावर रक्त लागलेला फोटो शेअर केला आहे. ही मारहाण आपल्या सात वर्षांच्या मुलीसमोर झाली असून, त्यामुळे ती मानसिक धक्क्यात असल्याचा दावा देवान यांनी केला आहे. ते आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांच्यासोबत चार महिन्यांची चिमुकलीही होती.

देवान यांच्या म्हणण्यानुसार, "विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी लहान बाळासह प्रवास करत असल्याने त्यांना कर्मचारी सुरक्षा तपासणी मार्गाचा वापर करण्यास सांगितले होते. मात्र त्या ठिकाणी काही एअरलाईन कर्मचारी रांगेत पुढे जात असल्याचे त्यांनी पाहिले. यावर आक्षेप घेतल्यानंतर, एअर इंडिया एक्सप्रेसचे पायलट कॅप्टन विरेंद्र यांनी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप आहे."

देवान यांनी दावा केला की, "पायलटने त्यांना शिवीगाळ करत 'तुला वाचता येत नाही का?' आणि 'अनपढ आहेस का?' असे अपमानास्पद शब्द वापरले. वाद वाढत गेल्यानंतर पायलटने आपल्याला मारहाण केली, ज्यामुळे इजा होऊन रक्त आले," असे त्यांनी सांगितले. देवान यांनी पायलटच्या शर्टवर लागलेल्या रक्ताचे फोटो शेअर करत ते स्वतःचे रक्त असल्याचा दावा केला आहे.

या घटनेनंतर जबरदस्तीने तक्रार पुढे न देण्याचे पत्र लिहायला लावले असा गंभीर आरोपही देवान यांनी केला आहे. तसे न केल्यास विमान निघून जाईल आणि सुट्टीसाठी केलेल्या १.२ लाख रुपयांच्या बुकिंगचा तोटा होईल, अशी धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. देवान यांनी दिल्ली पोलिसांना टॅग करत, प्रवासानंतर तक्रार का दाखल करता येत नाही आणि घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित राहतील का?" असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एअर इंडिया एक्सप्रेसने निवेदन जारी केले आहे. कंपनीने या वर्तनाचा तीव्र निषेध करत संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ कामावरून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही कंपनीने सांगितले.

एअर इंडिया एक्सप्रेसने स्पष्ट केले की, संबंधित पायलट हा त्या वेळी दुसऱ्या एअरलाईनने प्रवास करत होता. तसेच, आपल्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिक आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा कायम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in