VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...

दिल्ली विधानसभा घुसखोरी प्रकरणात मोठा उलगडा झाला आहे. आरोपीने हरवलेल्या पुतण्याच्या शोधासाठी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...
VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...
Published on

दिल्ली विधानसभा परिसरात झालेल्या सुरक्षाभंगामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. हरवलेल्या पुतण्याचा शोध लागावा यासाठी थेट व्हीआयपी गेट तोडून आत प्रवेश केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात सरबजीत सिंग या व्यक्तीला अटक केले असून, त्याची कार जप्त करण्यात आली आहे.

सोमवारी (दि.६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश नोंदणी असलेल्या कारने विधानसभा परिसरातील व्हीआयपी गेट क्रमांक २ तोडत प्रवेश केला होता. आरोपीने आत प्रवेश करून पुष्पगुच्छ ठेवून तेथून पळ काढला होता.

पुतण्याच्या शोधासाठी प्रयत्न

सरबजीतच्या म्हणण्यानुसार, त्याचा पुतण्या हरमन सिंग हा १ एप्रिलपासून पश्चिम दिल्लीतील हरी नगर परिसरातून बेपत्ता आहे. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार करण्यात आली होती.

पिलिभीत येथील रहिवासी असलेला सरबजीत आपल्या पुतण्याचा शोध घेण्यासाठी प्रथम पंजाबमधील नांगल येथे गेला, मात्र त्याला काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर तो दिल्लीत आला.

VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...
दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षाभंग; गेट तोडून अज्ञात कारचा शिरकाव, पुष्पगुच्छ ठेवून चालक फरार

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असून मागील पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. तो १ एप्रिलनंतर केवळ एका रात्री संपर्कात होता. त्यानंतर तो बरेलीमार्गे दिल्लीत पोहोचला.

गुरुद्वारात जाण्याचा होता उद्देश

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरबजीत गुरुद्वारा बंगला साहिब येथे जाण्याच्या उद्देशाने पुष्पगुच्छ घेऊन निघाला होता. मात्र चुकून तो दिल्ली विधानसभा परिसरात पोहोचला आणि तिथेच हा सुरक्षाभंग घडला.

तपासादरम्यान सरबजीतने सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तो विधानसभा परिसरात गेला होता, जेणेकरून त्याच्या पुतण्याच्या प्रकरणाची दखल घेतली जाईल.

मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह

कुटुंबीयांनी सरबजीत मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पोलिसांच्या मते, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्याने नुकतीच 'टाटा सिएरा' कार खरेदी केली होती.

नेमकी घटना काय?

माहितीनुसार, सोमवारी दुपारी २:०५ वाजता सरबजीतने यूपी-२६ एझेड ८०९० क्रमांकाची कार घेऊन सीआरपीएफच्या सुरक्षा तुकडी असलेल्या व्हीआयपी गेट क्रमांक २वरून बॅरिअर तोडत प्रवेश केला. त्यानंतर त्याने विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या अधिकृत कारजवळ जाऊन त्यात पुष्पगुच्छ ठेवला.

यानंतर काही वेळ कारमध्ये बसून तो बाहेर आला आणि अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेरही पुष्पगुच्छ ठेवला. संपूर्ण घटना अवघ्या ५-६ मिनिटांत संपूर्ण घटना घडली. या घटनेवेळी अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आपल्या कार्यालयात उपस्थित होते. या घटनेत आरोपीकडे कोणतेही शस्त्र आढळलेले नाही.

रस्ता दाखवण्यासाठी टॅक्सी चालकांची मदत

दिल्लीतील रस्त्याची माहिती नसल्याने सरबजीतने टॅक्सी चालकांना २,००० रुपये दिले. त्याने त्यांना आपल्या कारमध्ये बसवून रस्ता दाखवायला सांगितले. विधानसभा परिसरातून बाहेर पडल्यावर त्याने संसद भवनाचा रस्ता विचारल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात टॅक्सी चालकांचा सहभाग आढळलेला नसून, तरीही तपास सुरू आहे.

पोलीस कोठडीत हिंसक वर्तन

सरबजीतला वैद्यकीय तपासणीनंतर तिस हजारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडीत त्याने अत्यंत आक्रमक वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने रात्रभर गोंधळ घालत लोखंडी गज हलवण्याचा प्रयत्न केला, तसेच "माझ्याकडे महाराजांची तलवार आहे," असे विचित्र दावे केल्याचेही सांगितले जात आहे.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in