

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोट प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी (JeM) संबंधित 'व्हाईट-कॉलर मॉड्यूल' भारतातील अनेक शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले आहे. २०२३ पासून भारतात भीषण हल्ला करण्याची योजना आखल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे.
चौकशीत कबुली
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सहआरोपी डॉ. मुजम्मिल शकीलने चौकशीत कबुली दिली असून हा कट २०२३ मध्येच रचला गेला होता आणि गेली दोन वर्षे त्यासाठी तयारी सुरू होती.
स्फोटासाठी आधीपासून नियोजन
लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या तपासात हे स्पष्ट झाले, की हा हल्ला मुख्य आरोपी डॉ.उमर नबीने अत्यंत नियोजनपूर्वक केला होता. सहआरोपी शकीलने बॉम्बसाठी लागणारे रसायन, इलेक्ट्रॉनिक घटक, रिमोट्स आणि इतर साहित्य हरियाणातील गुरुग्राम आणि नूंहमधून खरेदी करून फरीदाबादमधील भाड्याच्या घरात अनेक महीने जमवले होते. बॉम्बनिर्मितीसाठी आवश्यक केमिकल प्रक्रियाही केली होती. त्याने २६ क्विंटल NPK खते मिळवून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री तयार केली होती.
हल्ल्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांची कारवाई
हल्ल्यापूर्वीच दिल्ली पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत फरीदाबादमधून तब्बल २,९०० किलो स्फोटक पदार्थ, ३६० किलो ॲमोनियम नायट्रेट आणि IED तयार करण्यासाठी वापरले जाणारे अनेक साहित्य जप्त केले होते. या कारवाईनंतरच शकीलला अटक झाली. या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा सापडला असून शकीलचा संपर्क पाकिस्तानस्थित जैशच्या हँडलर ‘हन्जुल्ला’शी सतत होत असल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानातून बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ
‘हन्जुल्ला’ने शकीलला बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ पाठवले होते, तसेच हे नावही बनावट असल्याचा संशय आहे. श्रीनगरच्या नवगाम परिसरात गेल्या वर्षी दिसलेल्या जैशच्या पोस्टर्सवर 'कमांडर हन्जुल्ला भाई' असे नावही छापलेले आढळले होते. शकीलचा या हँडलरशी संपर्क शोपियानच्या मौलवी इरफान अहमदमार्फत होत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दहशतवादी हल्ले करण्याच्या कट
एकूण तपासातून दिल्ली स्फोट हा एक वेगळा हल्ला नसून भारतातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले करण्याच्या व्यापक कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयए आता या मॉड्यूलच्या नेटवर्कचा शोध अधिक गतीने घेत असून हा कट कुठवर पसरलेला आहे याचा तपास सुरू आहे.