

दिल्लीतील कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धागेदोरे समोर येत आहेत. या स्फोटाशी संबंधित महत्त्वाचे ‘मुंबई कनेक्शन’ आता उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीनुसार शहरातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघे दिल्ली स्फोटातील आरोपींशी सातत्याने संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आले आहे.
विशेष पथकाची गुप्त कारवाई
मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या गुप्त कारवाईत हे तिघे शहरातील वेगवेगळ्या भागांतून पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. हे तिघेही एका विशिष्ट सोशल मीडिया ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दिल्लीतील आरोपींशी जोडले गेले होते. विशेष म्हणजे, या तिघांचे आर्थिक पार्श्वभूमीही सक्षम असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
तपास यंत्रणांसाठी आव्हान
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. स्फोटाचा मुख्य सूत्रधार उमर नबीने तीन महिन्यांपूर्वी एक ‘एन्क्रिप्टेड सिग्नल ग्रुप’ तयार केला होता. या गटात हे तिघेही सदस्य म्हणून जोडले गेले होते. या ॲपवरील चॅट आणि कॉल्स उच्चस्तरीय एन्क्रिप्शनमध्ये असल्याने संभाषण आणि पुरावे मिळवणे तपास यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
सध्या या ॲपमध्ये असणारी चॅट हिस्ट्री, कॉल लॉग्ज, शेअर केलेल्या फाइल्स आणि डिजिटल ट्रेस तपासण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असलेल्या डिजिटल फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आल्या आहेत. या तपासातून आरोपींच्या संवादांची नेमकी माहिती, योजनांची आखणी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.