
मध्य दिल्लीतील हौज काझी परिसरात समाजाला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्री आईवर दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी पीडित आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून नराधम मुलाला अटक करण्यात आली आहे.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित ६५ वर्षीय महिला तिचा निवृत्त सरकारी कर्मचारी पती, ३९ वर्षीय आरोपी मुलगा आणि २५ वर्षीय मुलीसह हौज काझी परिसरात राहते. तिची आणखी एक विवाहित मुलगीही याच भागात राहते. १७ जुलै रोजी पीडिता, तिचा पती आणि मुलगी धार्मिक तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. त्यावेळी आरोपी मुलाने वडिलांना परत येण्यास सतत कॉल केले. १ ऑगस्ट रोजी कुटुंबीय भारतात परतल्यानंतर घरात वाद सुरू झाले. तक्रारीत पीडितेने सांगितले की, मुलगा आईवर विवाहबाह्य संबंधाचा संशय घेत होता आणि वडिलांना घटस्फोट द्यावा, असा दबाव टाकत होता. या वादातून संतापलेल्या आरोपीने आईवर हल्ला करून एका खोलीत बंद केले.
आईचा धक्कादायक दावा
त्या रात्री आरोपीने इतर कुटुंबियांना आईशी एकांतात बोलायचे सांगितले. त्याने आईवर हल्ला केला आणि तिचा बुरखा फाडला. त्यानंतर आईला खोलीत बंद करून तिच्यावर बलात्कार केला. "आईने भूतकाळात चुका केल्या आहेत, त्याची शिक्षा देत आहे," असे सांगत त्याने हे कृत्य केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने मुलीच्या खोलीत झोपायला सुरुवात केली. परंतु, १४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता आरोपीने पुन्हा आईवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने धाकट्या मुलीला सर्व काही सांगितले आणि दोघींनी मिळून हौज काझी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून मुलाला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना अत्यंत गंभीर आहे. वैद्यकीय तपासणी तसेच चौकशी सुरू आहे.