

दिल्लीतील मेहरौली भागात राहणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांसोबत फुटपाथवर झोपलेल्या या चिमुरडीचे पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या ६ तासांत एका नराधम कॅब चालकाला अटक केली आहे.
ही घटना सोमवारी (२२ जून) पहाटे घडली. मुलगी अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच पालकांनी शोध सुरू केला आणि अपहरण झाल्याच्या संशयावरून मेहरौली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सीसीटीव्हीमधून आरोपीचा शोध
पीटीआयच्या वृत्तानुसार, तक्रार मिळताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान एका कॅब चालकाची हालचाल संशयास्पद आढळून आली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०-३५ वयोगटातील आणि मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या आरोपीने, पहाटे सुमारे पाच वाजता झोपेत असलेल्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली.
२० पथकांची शोधमोहीम
मुलीचा शोध घेण्यासाठी जवळपास २० पोलिस पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवून पोलिसांनी त्याचा माग काढला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळाच्या परिसरात आला होता. मात्र तेथे पोलिसांची उपस्थिती पाहून तो पळून गेला. त्यानंतर त्याचा पाठलाग करून पोलिसांनी अवघ्या सहा तासांत त्याला अटक केली.
लैंगिक अत्याचारानंतर हत्या
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचेही त्याने मान्य केले.
गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह फरीदाबाद-गुरुग्राम मार्गालगतच्या जंगल परिसरात फेकून दिला होता. आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री मृतदेह ताब्यात घेतला.
फॉरेन्सिक तपास सुरू
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण आणि इतर वैद्यकीय पुरावे तपासले जात आहेत. फॉरेन्सिक पथकाने अपहरणस्थळ आणि मृतदेह सापडलेल्या जंगल परिसरात सखोल तपास केला असून, विविध नमुने व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणात आरोपीने हा निर्घृण गुन्हा एकट्याने केला की त्याचे आणखी साथीदार होते, यासह आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास तपासत आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.