बांगलादेशातील हिंदू कामगाराच्या हत्येचा दिल्लीत निषेध; पोलिस-आंदोलकांमध्ये संघर्ष

बांगलादेशात हिंदू कामगार दिपू चंद्र दास यांच्या जमावाकडून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाबाहेर हिंदू संघटनांने तीव्र आंदोलन छेडले.
बांगलादेशातील हिंदू कामगाराच्या हत्येचा दिल्लीत निषेध; पोलिस-आंदोलकांमध्ये संघर्ष
बांगलादेशातील हिंदू कामगाराच्या हत्येचा दिल्लीत निषेध; पोलिस-आंदोलकांमध्ये संघर्ष
Published on

बांगलादेशात हिंदू कामगार दिपू चंद्र दास यांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तसेच अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाबाहेर मंगळवारी (२३ डिसेंबर) मोठे आंदोलन पुकारण्यात आले. विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल तसेच सर्व भारतीय हिंदी बंगाली संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांशी धक्काबुक्कीही केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश उच्चायोग परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असूनही आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.

घोषणाबाजी आणि पोलिसांशी संघर्ष

दुर्गाबाई देशमुख साउथ कॅम्पस मेट्रो स्टेशन परिसरात जमलेल्या आंदोलकांनी “भारत माता की जय”, “युनूस सरकार होश में आओ”, “बांगलादेश मुर्दाबाद”, “हिंदू हत्या बंद करो” अशा जोरदार घोषणा दिल्या. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, आंदोलकांना बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमुळे उच्चायोगाच्या इमारतीकडे जाण्यापासून रोखण्यात आले.

बांगलादेशची प्रतिक्रिया; व्हिसा सेवा स्थगित

दरम्यान, भारत-बांगलादेश तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने नवी दिल्ली आणि अगरतळा येथील दूतावासांमधील व्हिसा आणि कॉन्स्युलर सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. तसेच, भारतातील आंदोलनांवर नाराजी व्यक्त करत बांगलादेश सरकारने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून निषेध नोंदवला.

दिपू चंद्र दास प्रकरण काय?

दिपू चंद्र दास हे बांगलादेशातील मयमनसिंह येथील एका कारखान्यात काम करत होते. १८ डिसेंबरच्या रात्री एका सहकाऱ्याने त्यांच्यावर कथित ‘धर्मनिंदा’ केल्याचा आरोप केला. त्यानंतर जमावाने दिपू दास यांना बेदम मारहाण करून ठार केले. तसेच, त्यांचा मृतदेह झाडाला टांगून पेटवण्यात आला. मात्र, मयमनसिंहमधील RAB-14 चे कंपनी कमांडर मोहम्मद समसुझ्जमान यांनी ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राला सांगितले की, “मृत व्यक्तीने सोशल मीडियावर धर्मभावना दुखावणारे काहीही लिहिल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.”

या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in