

नवी दिल्ली : दसऱ्यानिमित्त रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. मात्र, यंदा नवी दिल्लीतील रामलीला कार्यक्रमात या पुतळ्यांसोबतच ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. पीतमपुरा येथील श्री केशव रामलीला समितीने हा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत आयोजकांचे आभार मानले आहेत.
निर्णयामागे कारण काय?
दिल्लीतील पीतमपुरा येथे दरवर्षी श्री केशव रामलीला समितीकडून रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांसोबत झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्याची घोषणा समितीने केली आहे. या निर्णयामागे अस्वच्छता आणि घाणीविरोधात जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दिपकेंचा आयोजकांना टोला
दिपके यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आयोजकांनी सीजेपीला 'मोफत प्रसिद्धी' दिल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानातून त्यांनी आयोजकांना उपरोधिक टोला लगावला. दरम्यान, सीजेपीच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी या निर्णयाला 'तमाशा' असे संबोधले.
वाईटावर चांगल्याचा विजय हा दसऱ्याचा संदेश
समितीचे अध्यक्ष आणि भाजप आमदार अशोक गोयल यांनी या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. अस्वच्छतेचे प्रतीक म्हणून झुरळाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. स्वच्छ भारत आणि स्वच्छ दिल्ली अभियानांतर्गत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणे, तसेच वाईटावर चांगल्याचा विजय हा दसऱ्याचा संदेश अधोरेखित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी दिल्लीत सीजेपीकडून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या घोषणेकडे लक्ष वेधले जात आहे. या संघटनेने सुरुवातीला माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांमध्येही सीजेपी सहभागी झाला होता.
युजर्सकडून टीका
झुरळाच्या पुतळ्याच्या दहनाच्या निर्णयावरून समाजमाध्यमांवरही चर्चा सुरू झाली आहे. धार्मिक उत्सवात अशा प्रकारचा पुतळा दहन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न काही युजर्सने उपस्थित केला आहे. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींची सांगड पारंपरिक सणाशी घातली जात असल्याची टीकाही काही जणांकडून केली जात आहे.