Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जखमी झाले. हा स्फोट शहरातील सर्वात संवेदनशील परिसरांपैकी एक असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली.
Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय
Published on

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जखमी झाले. हा स्फोट शहरातील सर्वात संवेदनशील परिसरांपैकी एक असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेमागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. तसेच, या स्फोटाचा संबंध पुलवामाशी असल्याचेही धागेदोरे सापडले आहेत.

स्फोटक कार पुलवामाशी संबंधित

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेली ह्युंदाई i२० ही कार काही दिवसांपूर्वी पुलवामाच्या रहिवाशाला विकण्यात आली होती. या कारच्या खरेदी-विक्रीतही बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कारच्या मालकीचे धागेदोरे पुढे नेताच तपास फरिदाबाद आणि कश्मीरपर्यंत पोहोचला.

फरिदाबादमधील डॉक्टरवर संशय

तपासात उमर नबी नावाच्या डॉक्टरचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उमर नबी हा पुलवामा येथील रहिवासी असून फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठात मेडिकल सायन्स विभागात कार्यरत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दृश्यात कार चालवणारी व्यक्ती नबीसोबत मिळती जुळती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्फोटात कारचे पूर्ण नुकसान झाल्याने डीएनए तपास सुरू आहे.

स्फोटकांचा मोठा साठा जप्त

उमर नबीच्या सहकाऱ्यांपैकी डॉ. मुझम्मिल अहमद गणाई आणि डॉ. अदील मजीद रदर यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. डॉ. गणाईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फरिदाबादच्या धौज गावातील घरातून ३५८ किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले. हीच स्फोटके लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्यासाठी वापरली गेली असावीत, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

पुलवामातून पाच जण ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी पुलवामा परिसरातून किमान ५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये कारचा सध्याचा मालक अमीर राशिद, त्याचा भाऊ आणि आसपासच्या गावातील आणखी तीन व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय लखनऊमधील एका महिला डॉक्टरलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कटात वैद्यकीय क्षेत्रातील किमान ४ व्यक्तींचा सहभाग असू शकतो. त्यापैकी दोन जण कोठडीत आहेत, तर एकाचा (उमर नबी) मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in