दिल्ली येथील जीबी पंत रुग्णालयाशी संबंधित एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील एक वरिष्ठ महिला डॉक्टर तब्बल तीन वर्षे अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर राहूनही सरकारी पगार घेत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या काळात ती कॅनडामध्ये चित्रपट शूटिंग करतअसल्याचे समोर आले आहे. तिच्या या कारनाम्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतली असून तिला नोटीस बजावली आहे. तसेच, तिला विभागप्रमुख पदावरूनही हटवण्यात आले आहे.
कोण आहे ही डॉक्टर?
डॉ. मंजू सुब्बरवालवर ही जीबी पंत रुग्णालयात बायोकेमिस्ट्री विभागाची प्रमुख होती. २०२२ ते २०२५ दरम्यान ती ड्यूटीवर गैरहजर असूनही लाखोंचा पगार घेत असल्याचे समोर आले. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तिच्या विरोधात आरोपपत्र तयार करून मंत्रालयाला सादर केले आहे.
धक्कादायक म्हणजे ती गेली तीन वर्षे कॅनडा येथे राहत असून तिथे चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचेही उघडकीस झाले आहे. तिने स्वत: सोशल मीडिया प्रोफाईलवर तिची ओळख चित्रपट निर्माती, लेखिका आणि संपादक असल्याचे पोस्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर ती स्वतःला ‘टेलि अवॉर्ड विजेती’ म्हणूनही मिरवत असल्याचे दिसून आले आहे.
तक्रारकर्त्याने ती २०२२ मध्ये कॅनडामध्ये गेल्याचे म्हंटले आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून समजते, की तिने या कालावधीत ॲनिमेशनमध्ये सर्टिफिकेशन कोर्स केला असून नंतर एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२५ पर्यंत टोरंटो फिल्म स्कूलमधून बॅचलर ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्सची पदवी घेतली आहे. तर, तिने कलर्स (२०२४), तोटका (२०२१) आणि योर्स फेथफुली (२०१९) असे तीन चित्रपट केल्याचेही समजते.
कठोर कारवाईचा इशारा
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणात तपास सुरू केला आहे. त्यासाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRO) सुब्बरवालच्या भारतातील संभाव्य भेटींबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
मंत्रालयाकडून पाठवलेल्या नोटीसमध्ये तिच्या तीन वर्षांच्या अनधिकृत अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. नोटिसमध्ये स्पष्ट लिहिले आहे, की तिच्या अनधिकृत गैरहजेरीला सेवेतील खंड का मानू नये? तसेच, या कालावधीत दिलेला भत्ता आणि वेतन का वसूल केले जाऊ नये? सुब्बरवाल हिचे उत्तर समाधानकारक नसल्यास तिच्यावर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई होऊ शकते. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, की अनधिकृत गैरहजेरी आणि नियमभंग सहन केला जाणार नाही.