१० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या स्पर्धेत माणसाचा जीव किती स्वस्त झाला आहे, असा सवाल उपस्थित करणारा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रॅफिकमधून थेट रोलर स्केट्सवर डिलिव्हरी करताना दिसत असून, त्याचा हा वेग पाहता क्षणभरासाठीही काळजात धडकी भरते.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय दिसतं?
व्हायरल व्हिडीओत संबंधित तरुण मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक असताना पाठीवर डिलिव्हरी बॅग घेऊन रोलर स्केट्सवरून जाताना दिसतो. कार, बाईक आणि ऑटो यांच्यामधून तो तोल सांभाळत वेगाने पुढे जातो. काही ठिकाणी वाहने अगदी जवळून जात असतानाही तो वेग कमी करत नाही. विशेष बाब म्हणजे त्याने कोणतीही सुरक्षा साधनं परिधान केलेली दिसत नाहीत. हेल्मेट, गुडघे किंवा कोपरांचे पॅड नसल्यामुळे हा प्रवास अधिक धोकादायक वाटतो आणि क्षणभराची चूकही गंभीर अपघातात बदलू शकते.
या व्हिडीओमध्ये त्याने ब्लिंकिटचा टी-शर्ट घातलेला असून, त्याच्या पाठीवर डिलिव्हरी बॅग असल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, हा तरुण ब्लिंकिटचा अधिकृत डिलिव्हरी पार्टनर आहे की नाही, तसेच हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर चर्चा, संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी या तरुणाच्या कौशल्याचं कौतुक केलं असलं, तरी अनेकांनी हा प्रकार थेट जीवघेणा असल्याचं म्हटलं आहे. “ही डिलिव्हरी नाही, हा धोका आहे”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काही जणांना हा सीन चित्रपटातील सुपरहिरोची आठवण करून देत असला, तरी वास्तवात हा प्रकार किती धोकादायक आहे, यावर अनेकांनी बोट ठेवलं आहे.
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर प्रश्नचिन्ह
हा व्हिडीओ अशा वेळी समोर आलाय, जेव्हा १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या सेवांबाबत सुरक्षिततेचे मुद्दे देशभरात चर्चेत आहेत. वेगाच्या या स्पर्धेत डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींवर किती ताण येतो, त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमके काय उपाय आहेत, असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.