जलाभिषेकासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कावडियांच्या बसची गॅस सिलेंडरच्या ट्रकला जोरदार धडक, १८ जणांचा मृत्यू

झारखंडमधील देवघर जिल्ह्यात आज (मंगळवार, २९ जुलै) सकाळी श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान एक भीषण अपघात घडला.
जलाभिषेकासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कावडियांच्या बसची गॅस सिलेंडरच्या ट्रकला जोरदार धडक, १८ जणांचा मृत्यू
Published on

झारखंडमधील देवघर जिल्ह्यात आज (मंगळवार, २९ जुलै) सकाळी श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान एक भीषण अपघात घडला. भाविकांनी भरलेल्या बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात १८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना देवघर जिल्ह्यातील मोहनपूर प्रखंडातील जमुनिया चौकाजवळ पहाटे सुमारे ५:३० च्या सुमारास घडली. कावड यात्रेतील भाविकांची बस हंसडीहा मार्गावरून बासुकीनाथकडे जात होती. यावेळी गोड्डा-देवघर मार्गावर सिलेंडरने भरलेल्या भरधाव ट्रकने बसला भीषण धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.

बसमधून किंकाळ्या ऐकू येत होत्या -

श्रावण महिन्यानिमित्त बाबाधाम बैद्यनाथ मंदिरात जलाभिषेकासाठी हे भाविक निघाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडक एवढी भीषण होती, की बसचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. बसमधून वाचवण्यासाठी लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. अनेक भाविक बसच्या तुटलेल्या अवशेषांमध्ये अडकले होते.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस, रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांनी तातडीने धाव घेतली. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने मदतकार्य राबवण्यात आले. जखमींना तत्काळ मोहनपूर सीएचसी तसेच देवघर सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचे शवविच्छेदन सुरू असून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट -

अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बस चालकाला झोप लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून अधिक तपशील लवकरच स्पष्ट होतील.

ही दुर्घटना कावड यात्रेदरम्यान घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in