नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह एनसीआर भागात उष्णतेची लाट पसरली आहे. यात गेल्या २४ तासात १३ जणांचा बळी गेला आहे. तर नोएडात नऊ जणांचे प्राण गेले.
दिल्लीत बुधवारची रात्र १२ वर्षातील सर्वात उष्ण राहिली. किमान तापमान ३५.२ अंश सेल्सीयस नोंदवले गेले. जून २०१२ मध्ये ३४ अंश तापमान नोंदवले गेले होते.
दिल्लीच्या अनेक भागात नऊ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला. त्यातील पाच मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. उष्माघातामुळे यांचा मृत्यू झाला असावा. या मृतदेहावर मारहाणीच्या खूणा नाहीत. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याच्या अहवालानंतर योग्य कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात २४ तासात १३ मृतदेह आणले गेले
गेल्या मंगळवारी दिल्लीत उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडे अजूनही पाच जिल्ह्यांची माहिती नाही. बहुतांशी मृत आढळलेले लोक फुटपाथावर राहणारे आहेत. तर दिल्लीच्या ३८ रुग्णालयांमध्ये रोज बेशुद्ध, उल्टी व चक्कर आल्याने १०० हून अधिक रुग्ण दाखल होत आहेत.
हज यात्रेत ५७७ जणांचा उष्णतेमुळे मृत्यू
सौदी अरेबियाच्या मक्का येथे १२ ते १९ जून दरम्यान ५७७ हज यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. १७ जून रोजी मक्केत ५२ अंश तापमान नोंदवले गेले. मृतांमध्ये ३२३ जण इजिप्त तर ६० जण जॉर्डनचे नागरिक होते. तसेच इराण, इंडोनेशिया आणि सेनेगलच्या काही यात्रेकरूंचा मृतांमध्ये समावेश आहे.