
उत्तर प्रदेशमधील मेरठ कॅन्ट रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (दि. १) रात्री एक धक्कादायक आणि जीवघेणी घटना घडली. रात्री सुमारे ११ वाजता, एक मद्यधुंद लष्करी जवान आपली अल्टो कार चालवत थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर घुसला. त्याच्या या धोकादायक कृत्यामुळे स्टेशन परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित जवानाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या जवानाचे नाव संदीप ढाका असून, तो भारतीय लष्करात कार्यरत आहे. तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. कार चालवत असताना त्याने थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आणि तेथे उभ्या असलेल्या ट्रेनच्या समांतर गाडी चालवण्याचा प्रयत्न त्याने केला.
पाहा व्हिडिओ -
हा प्रकार अचानक घडल्यामुळे प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली. एक प्रत्यक्षदर्शी प्रवासी म्हणाले, “आम्ही ट्रेनची वाट पाहत होतो, तेव्हा अचानक एक कार प्लॅटफॉर्मवर आली. आम्ही सर्वजण घाबरलो. जर ट्रेन वेळेवर थांबली नसती, तर मोठा अपघात होऊ शकला असता.”
घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि स्थानिक पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करत जवानाला अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याच्या मद्यधुंद अवस्थेची पुष्टी झाली असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, स्थानकातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत.