गोसाबा : आसामच्या होजाई जिल्ह्यात शनिवारी रेल्वेच्या धडकेत ८ हत्तींचा मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्राने अहवाल मागवला असल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी सांगितले.
पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथे ‘प्रोजेक्ट एलिफंट’ आणि ‘नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी’च्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी, अरवली प्रदेशाच्या संरक्षणाबाबत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.
‘अरवलीच्या एकूण १.४४ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये फक्त ०.१९ टक्के क्षेत्रातच खाणकामाची परवानगी असू शकते. उर्वरित संपूर्ण अरवली क्षेत्र संरक्षित आहे,’ असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यादव म्हणाले.
यादव म्हणाले की, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करणार आहे. २० नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या समितीने दिलेल्या अरवली पर्वत व श्रेणीच्या व्याख्यांवरील शिफारसी मंजूर केल्या.
हत्तींच्या रेल्वे अपघाताबाबत बोलताना यादव म्हणाले की, सर्व राज्यांना रेल्वेमार्गालगत हत्तींच्या हालचालींचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वेमार्गावरील हत्तींच्या हालचालीबाबत राज्यांच्या वन विभागांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना महामार्गालगत हत्तींच्या हालचालीबाबत वन विभागाला अद्ययावत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. आसाम आणि देशातील ज्या कोणत्या भागात हत्तींचे अधिवास आणि रेल्वेमार्ग एकत्र आहेत, तेथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेल्वे, वनाधिकारी आणि स्थानिक लोकांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.