

झारखंडमधील खूंटी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि गोंधळात टाकणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह असल्याचा समज करून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार उरकल्यानंतर काही दिवसांनी ती व्यक्ती जिवंत घरी परतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय विश्राम मुंडा हे खूंटी जिल्ह्यातील पत्राटोली गावचे रहिवासी असून १० मे रोजी लग्नसमारंभासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले.
कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांना एका नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच विश्राम मुंडा यांच्या नातेवाईकांनी खूंटी सदर रुग्णालयात धाव घेतली.
मृतदेहाची उंची, शरीरयष्टी आणि चेहरा विश्राम मुंडा यांच्यासारखाच दिसत असल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनीही तो मृतदेह त्यांचाच असल्याचा समज केला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आणि आदिवासी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
अचानक मुलीच्या घरी पोहोचले
मात्र काही दिवसांनी विश्राम मुंडा अचानक त्यांच्या मुलीच्या खूंटी येथील भाड्याच्या घरात परतले. त्यांना पाहून कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी कोणालाही न सांगता रामगड येथे गेल्याचं नंतर सांगितलं.
या प्रकारानंतर पोलिसांनी आता दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती खूंटीचे उपविभागीय पोलिस अधिकारी वरुण राजक यांनी दिली.