
प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी जुन्या आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. महाकुंभ मेळा सुरू झाल्यापासून ही दुसऱ्यांदा आग लागली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत आग लागल्याची खबर मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तत्काळ कळवण्यात आले. तेथे पोहचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.
अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा म्हणाले, आम्हाला छतनाग घाट पोलीस ठाणे परिसरातील १५ तंबूंमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ कारवाई करण्यात आली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. कुंभमध्ये याआधीही दोनदा आगीच्या घटना घडल्या आहेत. महाकुंभमेळ्यातील सेक्टर २ मध्ये दोन गाड्यांना आग लागल्यानंतर गोंधळ उडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
यापुढे महाकुंभ परिसरातील गर्दी नियंत्रित करणे आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसर वाहनमुक्त क्षेत्र, व्हीव्हीआयपी पास रद्द
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविक ठार झाले, तर ६० जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळा परिसराचा आढावा घेतला. त्यानंतर हा संपूर्ण परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच व्हीव्हीआयपी पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. शहरात चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे. भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था, बाहेरील जिल्ह्यांमधून येणारी वाहने प्रयागराजच्या सीमेवरच थांबवली जाणार, असे पाच बदल करण्यात आले आहेत.