केरळच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी नाकारला ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार'

आरोग्यमंत्री असताना के. के. शैलजा यांनी कोरोना व निपाह विषाणूचा मुकाबला करताना मोठी भूमिका बजावली होती
 केरळच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी नाकारला ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार'

कोरोनाकाळात प्रभावी कामगिरी केलेल्या केरळच्या माजी आरोग्यमंत्री व माकपच्या ज्येष्ठ नेत्या के. के. शैलजा यांनी प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ घेण्यास नकार दिला आहे. सीपीएम पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना हा पुरस्कार स्वीकारू नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर आपण हा निर्णय घेतला; मात्र ‘मॅगसेसे पुरस्कार’ का स्वीकारू नये, याचे कारण पक्षाने दिले नाही, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री असताना के. के. शैलजा यांनी कोरोना व निपाह विषाणूचा मुकाबला करताना मोठी भूमिका बजावली होती. निपाह व कोरोना हे दोन्ही विषाणू पहिल्यांदा केरळमध्ये सापडले होते. के. के. शैलजा यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी लढाई लढली होती. ‘मॅगसेसे पुरस्कार’ निवड समितीने त्यांना ईमेल पाठवला होता. तसेच त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांची परवानगी मागितली होती.

सीपीएमच्या निर्णयावर नाराजी

सूत्रांनी सांगितले की, पक्ष असे समजतो की, के. के. शैलजा या सरकारकडून दिलेली जबाबदारी पार पाडत होत्या. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत श्रेय मिळू नये. ही एक सामूहिक जबाबदारी होती; मात्र सीपीएमच्या निर्णयावर काही नेते नाराज आहेत. संजय थॉमस म्हणाले की, “विजयन हे आपल्याशिवाय कोणावरही प्रकाशझोत टाकू इच्छित नाहीत.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in