Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील Birch by Romeo Lane नाईट क्लबमध्ये सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला असून डान्स फ्लोअरवर किमान १०० लोक उपस्थित होते. आता अग्निसुरक्षेतील त्रुटीही उघडकीस आल्या आहेत.
Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती
Published on

उत्तर गोव्यातील अर्पोरा भागात असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. नाईट क्लबमध्ये आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर किमान १०० जण उपस्थित होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही जण खाली पळाले तर काहीजण किचनमध्ये अडकून पडले, अशी माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत २३ जणांचा दुर्दैवी अंत झाला.

अर्पोरा गावातील बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) हे प्रसिद्ध ठिकाण राज्याची राजधानी पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. या दुर्घटनेचा प्रत्यक्ष थरार एका महिलेने सांगितला. पोलिसांनी सांगितले की "शनिवारी मध्यरात्रीनंतर नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर सुरू झाली, जिथे पर्यटक नाचत होते.

वीकेंड असल्याने क्लबमध्ये गर्दी

हैदराबाद येथील पर्यटक फातिमा शेख यांनी सांगितले की, "अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या आणि गोंधळ उडाला. आम्ही तात्काळ क्लबमधून बाहेर पडलो आणि बघितले तर पूर्ण इमारत जळत होती. "वीकेंड असल्याने क्लबमध्ये गर्दी होती आणि डान्स फ्लोअरवर किमान १०० जण उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.

गडबडीत ते किचनमध्ये गेले आणि...

पुढे त्या म्हणाल्या, "आग लागल्यानंतर काही पर्यटक जिना उतरून खाली गेले आणि गडबडीत ते थेट किचनमध्ये गेले, जिथे ते कर्मचाऱ्यांसह अडकून पडले," असेही त्यांनी सांगितले.

ताडाच्या पानांपासून बनवलेली इमारत

"ही इमारत ताडाच्या पानांपासून बनविण्यात आलेल्या तात्पुरत्या संरचनेने तयार करण्यात आली होती, ज्यामुळे आग वेगाने पसरली", असे फातिमा शेख म्हणाल्या.

अरुंद मार्गांमुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे

हा नाईटक्लब आर्पोरा नदीच्या मागील बाजूस असून येथे ये-जा करण्यासाठी अत्यंत अरुंद रस्ता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना क्लबपर्यंत पोहोचता आले नाही आणि त्यांची वाहने सुमारे ४०० मीटर अंतरावर उभी करावी लागली. अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, "अरुंद मार्गांमुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले, त्यामुळे आग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरले."

धूर ठरला मृत्यूला कारण

अधिकाऱ्यांनी सांगितले की, "बहुतांश मृत्यू धुरामुळे गुदमरून झाले, कारण पीडित व्यक्ती तळमजल्यावर अडकल्या होत्या."

नाईटक्लबकडून अग्निसुरक्षा नियमांचे पालन नाही

घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, "मृतांपैकी बहुतांश जण हे किचनमध्ये काम करणारे कर्मचारी होते. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश होता. तसेच तीन ते चार पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. नाईटक्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते."

"या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे तसेच क्लब व्यवस्थापन आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in