
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) बेकायदेशीर आणि अश्लील सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील, प्रौढ आणि महिलांचे विडंबनात्मक पद्धतीने कंटेंट प्रसारित करणाऱ्या २० हून अधिक अॅप्स, OTT प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. या सोबतच देशातील सर्व इंटरनेट सेवा प्रदात्यांना हे अॅप्स आणि वेबसाइट्स त्वरित ब्लॉक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कोणत्या अॅप्स व वेबसाइट्सवर बंदी?
या बंदीच्या यादीत काही प्रसिद्ध अॅप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. त्यामध्ये ULLU, ALTBalaji (ALTT), Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix, Triflicks यांचा समावेश आहे.
कायद्यानुसार कारवाई
या सर्व अॅप्स व वेबसाइट्सने भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ आणि ६७A, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९४ आणि स्त्रियांच्या विडंबनात्मक चित्रण प्रतिबंध अधिनियम १९८६ यांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अनुचित सामग्री प्रसारित केली जात होती, ज्यामुळे समाजावर गंभीर नकारात्मक परिणाम होत होते. ही सामग्री कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशिपशिवाय अवैध पद्धतीने प्रसारित केली जात होती.
या ॲप्सवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यात मुख्यतः अश्लील व्हिडिओ आणि वेब सिरीज प्रदर्शित करणे, वय पडताळणीशिवाय (age verification) अश्लील कंटेंट प्रदान करणे यांचा समावेश आहे.
हा विषय विधीमंडळाच्या क्षेत्रात येतो, आमच्या नाही - सर्वोच्च न्यायालय
एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्स व सोशल मीडियावर अश्लील कंटेंट रोखण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी Netflix, AMAZON PRIME, ULLU, ALTBalaji, एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांच्यासह अनेक प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावण्यात आली होती.
सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं होतं की, “ही याचिका गंभीर चिंता मांडते, परंतु हा विषय विधीमंडळाच्या क्षेत्रात येतो. आमच्या अधिकारक्षेत्रातील हा विषय नसल्याने केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत.”
हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता - प्रियंका चतुर्वेदी
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले, "ही खूप चांगली बातमी आहे. मी सतत ULLU आणि ALTBalaji या दोन अॅप्सबद्दल विशेषतः त्यांच्या कंटेंटबद्दल बोलत होते. तेव्हा कम्युनिकेशन आणि आयटीच्या स्थायी समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे खूप आधी करायला हवे होते, पण आनंद झाला आहे त्यांनी हा निर्णय घेतला आहे."