

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील सर्व अश्लील आणि बेकायदेशीर मजकूर हटवण्याचे निर्देश सरकारने शुक्रवारी ‘एक्स’ला कडक नोटीस बजावत दिले आहेत.
विशेष ‘ग्रोक’ या एआय ॲॅपद्वारे तयार होणारा किंवा प्रसारित होणारा मजकूर हटवण्यात यावा, अन्यथा कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० तसेच माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ अंतर्गत असलेल्या कायदेशीर दक्षतेच्या जबाबदाऱ्या पाळण्यात अपयश आल्याबद्दल ‘एक्स’च्या भारतातील कामकाजासाठी नियुक्त मुख्य अनुपालन अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे. कायद्यांचे उल्लंघन करून आधीच तयार केलेला किंवा प्रसारित केलेला सर्व मजकूर तत्काळ हटवावा किंवा त्यावर प्रवेश बंद करावा. हे सर्व आयटी नियम, २०२१ मध्ये ठरवून दिलेल्या कालमर्यादेत, कोणत्याही प्रकारे पुराव्याची हानी न करता, काटेकोरपणे केले जावे, असे आदेशात म्हटले आहे.