
देशभरात हुंडाबळीच्या घटना रोखण्यासाठी कायदे असूनही अजूनही तरुणींचा बळी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ग्रेटर नोएडामधील रूपबास येथे २८ वर्षीय तरुणीला सासू आणि पतीने मिळून जीवंत जाळल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडितेच्या ५ वर्षांचा मुलाने स्वतःच्या वडिलांनी आईला जाळल्याचे सांगितले. घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओदेखील समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचे नाव निक्की असून तिचे २०१६ साली विपिन भाटी नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते. विशेष म्हणजे निक्कीची बहीण कंचन हिचेही लग्न याच कुटुंबात लागले होते. सुरुवातीला संसार सुखाचा सुरू असला तरी काही वर्षांत निक्कीच्या आयुष्यात काळोख दाटला. तिचा नवरा दारूच्या आहारी गेला होता. तो तिला वारंवार मारहाण करत असे, शिवाय विवाहबाह्य संबंधांमुळे घरात भांडणं सुरू झाली.
या सर्वावर तिने आवाज उठवला तेव्हा तिचा छळ अधिकच वाढला. सासू आणि पती दोघे मिळून तिला मारत असे. दोघे मिळून तिच्यावर माहेरहून ३५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकू लागले. निक्कीने यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या पतीने आणि सासूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकले.
ही हृदयद्रावक घटना निक्कीच्या लहान मुलासमोरच घडली. "पपाने आईला आधी मारलं, मग लाईटरने पेटवलं," असे त्या चिमुकल्याने सांगितले. त्याचबरोबर निक्कीची बहीण कंचन हिने या घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र समाजमाध्यमांवर आणि स्थानिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.