गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

गुजरातमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर गुजरातच्या राजकारणात एक मोठा फेरबदल झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आहेत.
गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार
Published on

गुजरातमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर गुजरातच्या राजकारणात एक मोठा फेरबदल झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामे सादर केल्याचे समजते. भूपेंद्र पटेल आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन नव्या मंत्रिमंडळ स्थापनेचा प्रस्ताव सादर करतील. उद्या (दि. १७) नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

सर्व मंत्र्यांचे राजीनामे 'खिशात तयार'

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी गुरुवारी (दि. १६) सकाळी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. आश्चर्याची बाब म्हणजे सर्व मंत्र्यांकडे आधीपासूनच स्वाक्षरी केलेली राजीनाम्याची पत्रे होती. बैठकीनंतर सर्वांनी एकाचवेळी खिशातून राजीनामे बाहेर काढले आणि सुपूर्द केले. आता हे राजीनामे राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले जातील.

नव्या मंत्रिमंडळात १० नव्या चेहऱ्यांना संधी

सूत्रांच्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात १० नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये तरुण नेते आणि समाजातील विविध घटकांचे संतुलन राखण्यावर भर देण्यात येईल. संभाव्य नवीन मंत्र्यांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि सी. जे. चावडा यांचा समावेश असू शकतो. तसेच जयेश राडाडिया आणि जितू वाघाणी यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

जुन्या दिग्गजांना पुन्हा संधी?

गुजरातमधील काही जुने, परंतु प्रभावी नेते जे आतापर्यंत सक्रिय भूमिकेत नव्हते, त्यांनाही पुन्हा संधी दिली जाऊ शकते. भाजप २०२७ च्या निवडणुकांपूर्वी कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे अनुभवी आणि नवे दोन्ही चेहरे नव्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील.

अमित शाह आणि जे. पी. नड्डा गुजरात दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री ९ वाजता गुजरातमध्ये पोहोचतील, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या सकाळी गुजरातला येतील. राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील बन्सल यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. शपथविधी सोहळा गांधीनगरमध्ये मोठ्या थाटात पार पडेल. या पार्श्वभूमीवर सर्व भाजप आमदारांना पुढील दोन दिवस गांधीनगरमध्येच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तीन वर्षांनंतर मोठा फेरबदल

भूपेंद्र पटेल यांनी २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षांत कोणतेही मोठे फेरबदल झाले नव्हते. आता अचानक झालेला हा निर्णय २०२७च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग मानला जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, काही मंत्री पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले होते. तसेच अलीकडच्या विसावदर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने परिस्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते.

सत्ताविरोधी लाटेचा परिणाम?

राज्याच्या राजकारणात झालेल्या सततच्या बदलांमुळे लोकांमध्ये सत्ताविरोधी भावना वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी आणि आता भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये झालेल्या मोठ्या फेरबदलांनी गुजरातमधील राजकीय अस्थिरता अधोरेखित केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in