Guwahati Journalist : "हे सगळ्यांच्या भल्यासाठी"; महिला पत्रकाराची न्यूजरूममध्ये आत्महत्या, १५ दिवसांनी होतं लग्न

गुवाहाटीतील एका डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये कार्यरत असलेल्या २७ वर्षीय महिला पत्रकाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि. २४) सकाळी ऑफिसमध्ये तिचा मृतदेह आढळताच सर्वत्र खळबळ उडाली.
Guwahati Journalist : "हे सगळ्यांच्या भल्यासाठी"; महिला पत्रकाराची न्यूजरूममध्ये आत्महत्या, १५ दिवसांनी होतं लग्न
Published on

गुवाहाटीतील एका डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये कार्यरत असलेल्या २७ वर्षीय महिला पत्रकाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि. २४) सकाळी ऑफिसमध्ये तिचा मृतदेह आढळताच सर्वत्र खळबळ उडाली.

मृत पत्रकाराचे नाव रितुमोनी रॉय असून ती ‘Sach The Reality’ या डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये अँकर आणि रिपोर्टर म्हणून काम करत होती. यापूर्वी तिने विविध डिजिटल माध्यमांमध्येही काम केले होते.

१५ दिवसांनी होणार होतं लग्न

५ डिसेंबर रोजी रितुमोनीचे देबाशीष बोरा याच्यासोबत लग्न ठरले होते. निमंत्रणपत्रिका वितरित झाल्या होत्या आणि मेहंदीपासून प्री-वेडिंग सेलिब्रेशनपर्यंतची तयारी जोरात सुरू होती.
शनिवारी ती मित्रांच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि त्या दिवशी ती अत्यंत आनंदी व उत्साही दिसत असल्याचे मित्रांनी सांगितले. मात्र, घरी न जाता ती थेट ऑफिसमध्ये गेली. रात्री उशिरा देबाशीषने केलेले कॉल्स तिने रिसिव्ह केले नाहीत.

सकाळी ऑफिसचा दरवाजा आतून बंद

सोमवारी सकाळी सहकर्मी कामावर पोहोचले तेव्हा ऑफिसचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना दिसले. रितुमोनी सकाळी लवकर ऑफिसला जायची त्यामुळे ऑफिसची चावी तिच्याकडेच होती. बराच वेळ दार ठोठावून दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. आत रितुमोनी पंख्याला शॉलने फास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये थरारक क्षण

ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये रितुमोनी रात्री ऑफिसमध्ये येताना, संगणकावर काही वेळ काम करताना आणि नंतर टेबलावर खुर्ची ठेवून फास तयार करताना दिसत असल्याचे ऑफिस मालक शुभम अग्रवाल यांनी सांगितले. गळफास घेतल्यानंतर ती काही क्षण संघर्ष करतानाचे थरारक दृश्यही फुटेजमध्ये दिसत आहेत.

सुसाईड नोटमध्ये लिहिलं – “हे सगळ्यांच्या भल्यासाठी”

घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यात फक्त एकच वाक्य लिहिले होतं
“हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. माफ करा.” त्यामुळे रितुमोनीने आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे संकेत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. लग्न अगदी जवळ असताना, ती आनंदी दिसत असतानाही तिने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in