हरियाणाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

हरियाणाच्या पोलीस विभागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.७) घडली.
हरियाणाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
Published on

हरियाणाच्या पोलीस विभागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.७) घडली. ते सध्या सुनारिया पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात (Police Training College, Sunaria - Rohtak) सहाय्यक पोलीस महासंचालक (ADGP) म्हणून कार्यरत होते. त्यांची IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

मुलीने पाहिला वडिलांचा मृतदेह

ही घटना चंदीगडमधील सेक्टर ११ येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी घडली. आज दुपारी पूरन कुमार यांच्या मुलीने त्यांना तळघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. चंदीगड पोलीस व फॉरेन्सिक पथक (CFSL टीम) घटनास्थळी दाखल झाले. पण, पूरन कुमार यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूल आढळले असून, सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यांचा मृतदेह सेक्टर १६ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

IAS पत्नी सध्या जपान दौऱ्यावर

पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या २००१ बॅचच्या हरियाणा केडरच्या IAS अधिकारी असून त्या सध्या नागरी उड्डाण विभागाच्या आयुक्त व सचिव म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत जपान दौऱ्यावर होत्या.

प्रामाणिक आणि कुशल अधिकारी म्हणून ओळख

२००१ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले वाय. पूरन कुमार हे प्रामाणिक, तडफदार आणि कार्यनिष्ठ अधिकारी म्हणून पोलीस खात्यात प्रसिद्ध होते. त्यांनी यापूर्वीही विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सहकारी अधिकारी आणि मित्रपरिवारात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

सध्या चंदीगड पोलीस आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पूरन कुमार यांनी सोमवारी त्यांच्या गनमॅनकडून पिस्तूल घेतले होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी कोणतंही आत्महत्येचं पत्र आढळलेलं नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पोलिसांनी सांगितले की, “आम्ही आत्महत्येचं कारण शोधत आहोत आणि सर्व बाजूने तपास करत आहोत. निष्पक्ष चौकशीनंतर लवकरच संपूर्ण माहिती स्पष्ट होईल.”

logo
marathi.freepressjournal.in