देशाच्या तापमानात गेल्या सात दिवसांत ८ ते १३ अंशांनी वाढ; ६ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनने देशातील काही राज्यांत लवकर एंट्री घेतली असली तरी त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात घामाच्या धारांमुळे लोकांना ओलेचिंब व्हावे लागत आहे.
देशाच्या तापमानात गेल्या सात दिवसांत ८ ते १३ अंशांनी वाढ; ६ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
Published on

नवी दिल्ली : मान्सूनने देशातील काही राज्यांत लवकर एंट्री घेतली असली तरी त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात घामाच्या धारांमुळे लोकांना ओलेचिंब व्हावे लागत आहे. गेल्या सात दिवसांत देशभरातील तापमानात ८ ते १३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यातच आता देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी पंजाबमधील भटिंडा हे ४७.६ अंश सेल्सिअस तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठिकाण होते. दुसरीकडे, हरियाणातील सिरसा येथे मंगळवारी ४६.२ अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानमध्ये उष्णतेचा कहर सुरूच असून ३ शहरांचे तापमान ४६ अंश किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले. श्री गंगानगरमध्ये ४७.४ अंश सेल्सिअस, कोटामध्ये ४६.३ अंश सेल्सिअस आणि बिकानेरमध्ये ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून पावसाने उघडीप घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पावसाचा हलकासा शिडकावा जरी पडला तरी उष्णतेत अधिक वाढ होत आहे. पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी पुढील तीन दिवस दमट, उष्ण आणि ढगाळ वातावरण राहील. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in