माणुसकी अजूनही जिवंत आहे! वकिलाशिवाय कोर्टात पोहोचले असहाय्य आजोबा; न्यायाधीशांनी जे केलं ते पाहून नेटकरीही भारावले

जगात आजही माणुसकी जिवंत आहे, याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींची सहृदयता आणि संवेदनशीलता पाहायला मिळते. हायकोर्टाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांनी एका हतबल वृद्ध व्यक्तीला दिलेली मदत पाहून नेटकरी भावूक झाले असून, त्यांच्या या माणुसकीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
माणुसकी अजूनही जिवंत आहे! वकिलाशिवाय कोर्टात पोहोचले असहाय्य आजोबा; न्यायाधीशांनी जे केलं ते पाहून नेटकरीही भारावले
Published on

जगात आजही माणुसकी जिवंत आहे, याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींची सहृदयता आणि संवेदनशीलता पाहायला मिळते. हायकोर्टाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांनी एका हतबल वृद्ध व्यक्तीला दिलेली मदत पाहून नेटकरी भावूक झाले असून, त्यांच्या या माणुसकीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कायद्याच्या कक्षा सांभाळत, न्यायाच्या व्यासपीठावरून दाखवलेली ही करुणा आणि समजूतदारपणाची भावना अनेकांच्या मनाला भिडत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं, की कोर्टात एक वृद्ध, हतबल आणि असहाय्य आजोबा न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्यासमोर उभे आहेत. त्यांची स्थिती पाहून न्यायमूर्ती त्यांना विचारतात, "तुमचे वकील कुठे आहेत?" मात्र आजोबांना हा प्रश्न समजत नाही. शेजारील वकिल त्यांना स्पष्ट करतात की, "न्यायमूर्ती विचारत आहेत, तुमचे वकील कुठे आहेत?" यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात, "मला वकिलांबद्दल काही माहीत नाही. मी पहिल्यांदाच कोर्टात आलोय. पोलिस स्टेशनमधूनच आज माहिती मिळाल्यावर इथे आलो आहे."

हे ऐकल्यावर न्यायमूर्ती अग्रवाल त्वरित पुढाकार घेतात. ते कोर्टात उपस्थित एका वकिलांना हाक मारतात, "शेवटी जे वकील साहेब बसले आहेत, त्यांना बोलवा." काही क्षणांत वकील समोर येतात. न्यायमूर्ती त्यांना विचारतात, "तुमचं नाव काय?"
वकील उत्तर देतात, "आकाश कौशिक बक्श."

त्यानंतर प्रश्न होतो, "तुम्ही किती वर्ष वकिली करता?"
बक्श म्हणतात, "चार वर्षांपासून."
यावर न्यायमूर्ती म्हणतात, "फक्त चार वर्ष? एवढ्याने चालणार नाही. किमान सात वर्षांचा अनुभव हवा."

यानंतर ते दुसऱ्या वकिलांना हाक मारतात - "तिवारीजी, इथे या."
त्यांना विचारतात, "किती वर्ष वकिली करताय?"
वकील तिवारी उत्तर देतात, "सर, वीस वर्षांपासून."

ज्यावर न्यायमूर्ती म्हणतात, "बोनाफाईडचं काही काम करा या चांगल्या माणसाचं! एक फाईल देतो, नीट वाचा."

यानंतर ते आजोबांना विचारतात, "तुम्ही स्वत:चा वकील कराल? की आम्ही आमच्या बाजूने वकील देऊ?" आजोबा अत्यंत नम्रपणे म्हणतात, "सर, तुम्हीच वकील द्या."

या उत्तरावर न्यायमूर्ती अग्रवाल हे वकील तिवारी यांना निर्देश देतात - "१२ तारखेला यांना कोर्टात बोलवा. आणि लक्षात ठेवा, त्यांच्याकडून कोणतीही फी घेऊ नका." तसंच आजोबांनाही स्पष्टपणे सांगतात - "या वकिलांना कोणतीही फी देऊ नका. त्यांचं मानधन हायकोर्ट देईल."

हा हृदयस्पर्शी प्रसंग असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी न्यायमूर्तींच्या या सहृदय वर्तनाचं मनापासून कौतुक केलं असून, "माणुसकी अजूनही जिवंत आहे", असे अनेकांनी लिहिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in