दिल्लीत उच्चांकी तापमान; पारा ५२.३ अंश सेल्सिअस

लोकसभेच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच दिल्लीवर सूर्यनारायणाची अवकृपा झाल्याने जनतेच्या शरीराची लाही-लाही झाली.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच दिल्लीवर सूर्यनारायणाची अवकृपा झाल्याने जनतेच्या शरीराची लाही-लाही झाली. दिल्लीतील तापमानाने आतापर्यंतचा विक्रम मोडला असून बुधवारी मुंगेशपूर येथे उच्चांकी म्हणजे ५२.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.

दिल्लीच्या वायव्य भागातील हवामान केंद्राने मंगळवारी ४९.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली होती. दुसऱ्याच दिवशी सूर्यनारायणाने अधिकच आग ओकली आणि पारा ५२.३ अंश सेल्सिअसवर नेला. दिल्लीतील आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान आहे,असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राजस्थानातून आलेल्या गरम वाऱ्यांनी प्रथम दिल्ली शहराच्या वेशीवर धडक दिली, असे हवामान विभागाचे प्रादेशिक प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. दिल्लीतील काही भाग मुख्यत्वे अशा प्रकारच्या गरम वाऱ्यांसाठी अधिक संवेदनक्षम आहेत आणि त्यामुळे स्थिती अधिक गंभीर झाली. मुंगेशपूर, नरेला आणि नजफगड यांना पूर्ण वेगाने आलेल्या या गरम वाऱ्यांचा प्रथम तडाखा बसला, असे ते म्हणाले.

मोकळ्या परिसरात वाढता किरणोत्सर्ग असतो, सूर्यप्रकाश आणि आडोशांचा अभाव यामुळे या प्रदेशात उष्णतेची अधिकच झळ बसली. पश्चिमेकडून वारे वाहू लागले की त्याचा पहिला फटका या प्रदेशांना बसतो कारण हे प्रदेश वेशीवर आहेत त्यामुळे प्रथम ते बाधित होतात आणि तापमान झपाट्याने वाढते, असे महेश पलावत या स्कायमेट वेदरच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मोकळा परिसर आणि नापीक जमीन यातील वाढत्या किरणोत्सर्गामुळे तापमान वाढते, असे हवामान खात्यातील चरणसिंग या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाढत्या तापमानामुळे बुधवारी शहरातील विजेच्या मागणीनेही उच्चांक गाठला, ८३०२ मेगावॅट इतकी विजेची मागणी होती, असे ऊर्जा विभागाकडून सांगण्यात आले.

रिमझिम पावसामुळे दिल्लीकरांना दिलासा

दिल्लीतील तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक गाठल्याने शरीराची काहिली होत असतानाच बुधवार सायंकाळी आकाश अचानक ढगाळ झाले आणि काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळाला. हवामान विभागाने ३०ते४० कि.मी.प्रतितास वेगाने वारे वाहून वादळाची शक्यताही वर्तविली आहे.

logo
marathi.freepressjournal.in