

हैदराबाद : कॉलेजमध्ये दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. विद्यार्थी-विद्यार्थिनी आनंदाने दांडिया खेळत होते. मात्र, अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लाइट लावण्यासाठी उभारलेला लोखंडी स्टँड कोसळला आणि क्षणात आनंदाचं वातावरण शोकात बदललं. तेलंगणातील हैदराबादमध्ये शनिवारी (दि. १७) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा हादरवणारा व्हिडीओही समोर आला आहे. या घटनेनंतर कार्यक्रमातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हैदराबादमधील एमव्हीएसआर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका वार्षिक तांत्रिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास दांडियाचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपायला अवघी १० मिनिटं बाकी असताना अचानक जोरदार वारा सुटला. त्यामुळे लाइट लावण्यासाठी उभारलेला एक स्टँड कोसळला. विद्यार्थिनी दांडिया खेळत असलेल्या ठिकाणीच हा स्टँड पडल्याने अनेक जण जखमी झाले.
इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीचा मृत्यू
या दुर्घटनेत सोना नारायण दास या विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. ती एमव्हीएसआर कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती. अपघातानंतर तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिची बहीण मीना नारायण दास हिलाही दुखापत झाली असून, तिला नादरगुलजवळील प्रत्युषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली होती.
या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. मात्र, जखमींच्या जिवाला धोका नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा
'कार्यक्रम संपायला १० मिनिटं बाकी होती'
कॉलेजचे संचालक प्रसन्न कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
"कार्यक्रम संपायला अवघी १० मिनिटं बाकी होती. त्याच वेळी अचानक जोरदार वारा आला. लाइटचा स्टँड वाऱ्याचा जोर सहन करू शकला नाही आणि विद्यार्थिनी दांडिया खेळत असलेल्या ठिकाणी कोसळला," असं त्यांनी सांगितलं.
अपघातानंतर रुग्णवाहिका येण्यास वेळ लागत असल्याने कॉलेज प्रशासनाने स्वतःच्या वाहनांतून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवलं. सुमारे नऊ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काहींचे सीटी स्कॅन करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
'सुरक्षेची योग्य काळजी घेतली नव्हती'; नातेवाइकांचा आरोप
मृत विद्यार्थिनीचे काका सुरेश यांनी कॉलेजमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान त्यांना अपघाताची माहिती मिळाली होती. लाइट आणि सजावटीसाठी उभारलेला खांब विद्यार्थिनीच्या डोक्यावर पडल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली गेली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला रुग्णालयात आणलं तेव्हाच तिचा मृत्यू झाला होता, असं सांगितल्याचा दावाही सुरेश यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि कठोर कारवाईचे निर्देश
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना चांगले वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच, अपघाताला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, लाइटचा स्टँड नेमका कसा कोसळला आणि कार्यक्रमाच्या आयोजनात सुरक्षेबाबत काही त्रुटी होत्या का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.