नवी दिल्ली: भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन आज (दि.२६) कर्तव्य पथावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या संचलनात भारताच्या लष्करी ताकदीचे भव्य दर्शन घडले. यंदाच्या परेडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेवर आधारित देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मे महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानविरोधातील ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची झलक यावेळी दाखवण्यात आली. या परेडमध्ये क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रणगाडे तसेच नव्या लष्करी यंत्रणांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ‘वंदे मातरम् - १५० वर्षे’ अशी होती.
ऑपरेशन सिंदूरची झलक
“Operation Sindoor: Victory Through Jointness” या नावाने सादर करण्यात आलेल्या देखाव्यात ऑपरेशनल सेंटर दाखवण्यात आले. यामध्ये ब्रह्मोस आणि एस-४०० यांसारख्या क्षेपणास्त्र प्रणालींच्या साहाय्याने ऑपरेशन सिंदूर कसे राबवले गेले, याचे सादरीकरण करण्यात आले.
पहिल्यांदाच ‘बॅटल अॅरे फॉरमॅट’
यंदा प्रथमच भारतीय सेनेचा टप्प्याटप्प्याने ‘बॅटल अॅरे फॉरमॅट’ सादर करण्यात आला. यामध्ये हवाई दलाचाही समावेश होता. हाय मोबिलिटी रेकॉनिसन्स व्हेईकल आणि भारतात बनवलेले पहिले आर्मर्ड लाईट स्पेशालिस्ट व्हेईकल यांचे प्रदर्शन करण्यात आले.
हेलिकॉप्टर्स आणि रणगाडे
ध्रुव अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर ऑपरेशन सिंदूरचा ध्वज घेऊन ‘प्रहार फॉर्मेशन’मध्ये उडताना दिसले. त्यांच्यासोबत सशस्त्र रुद्र हेलिकॉप्टर देखील होते. यानंतर टी-९० भीष्मा आणि मुख्य रणगाडा अर्जुन हे रणगाडे सॅल्यूटिंग डायससमोरून गेले. यांना अपाचे AH-64E आणि प्रचंड लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर यांची हवाई साथ होती.
क्षेपणास्त्रांचे आकर्षण
परेडमध्ये सूर्यास्त्र रॉकेट लाँचर, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाश मिसाइल यांचे प्रदर्शन झाले. तसेच डीआरडीओने विकसित केलेले LR-AShM हायपरसॉनिक मिसाइल देखील दाखवण्यात आले.
नौदल आणि वायुदलाची दमदार उपस्थिती
भारतीय नौदलाच्या देखाव्यात ‘Strong Navy for a Strong Nation’ ही संकल्पना साकारण्यात आली. यात प्राचीन जहाजाचे प्रतिकात्मक रूप, INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांसारख्या स्वदेशी युद्धनौका दाखवण्यात आल्या.
वायुदलाच्या संचलनासोबत राफेल, मिग-२९, सुखोई-३० आणि जग्वार विमानांनी ‘सिंदूर फॉर्मेशन’मध्ये आकाशात थरार निर्माण केला.
यावेळी युरोपियन युनियनची लष्करी तुकडी देखील परेडमध्ये सहभागी झाली होती. युरोपबाहेर प्रथमच ईयूच्या सैन्याने अशा संचलनात भाग घेतला, ही ऐतिहासिक बाब ठरली.