भारताची अंतराळ क्षेत्रात नवी झेप; देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय खासगी कंपनीने विकसित केलेले 'विक्रम-१' हे देशाचे पहिले ऑर्बिटल प्रक्षेपण यान असून, यामुळे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारतासाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
भारताची अंतराळ क्षेत्रात नवी झेप; देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण
भारताची अंतराळ क्षेत्रात नवी झेप; देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण(Photo-X)
Published on

श्रीहरिकोटा : भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हैदराबादस्थित स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने शनिवारी (दि.१८) देशातील पहिले खासगी विकसित ऑर्बिटल प्रक्षेपण यान 'विक्रम-१' यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले. या यशामुळे भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.

आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC-SHAR), श्रीहरिकोटा येथील फर्स्ट लॉन्च पॅडवरून दुपारी १२.०६ वाजता 'मिशन आगमन' अंतर्गत या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण सकाळी ११.३० वाजता होणार होते; मात्र अतिरिक्त तांत्रिक तपासण्यांमुळे नियोजित वेळेत थोडा बदल करण्यात आला.

जागतिक खासगी अंतराळ बाजारपेठेत भारताची एंट्री

संपूर्णपणे भारतीय खासगी कंपनीने विकसित केलेले 'विक्रम-१' हे देशाचे पहिले ऑर्बिटल प्रक्षेपण यान असून, यामुळे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारतासाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागातून स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देणारा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रक्षेपणापूर्वी स्कायरूट एअरोस्पेसने आवश्यक हवाई आणि सागरी परवानग्या मिळवल्या होत्या. रॉकेटच्या उड्डाण मार्गासह संभाव्य प्रभाव क्षेत्रात तात्पुरते हवाई आणि सागरी प्रतिबंधित क्षेत्रही घोषित करण्यात आले होते.

'विक्रम-एस'नंतर आणखी एक यश

ही स्कायरूट एअरोस्पेसची दुसरी अंतराळ मोहीम आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीने 'विक्रम-एस' या सबऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करत अंतराळात पोहोचणारे भारतातील पहिले खासगी विकसित रॉकेट सादर केले होते.

मोदींचा हस्तलिखित संदेशही अवकाशात

या मोहिमेला प्रतीकात्मक स्वरूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्ताक्षरात लिहिलेला 'वंदे मातरम्' संदेशही 'विक्रम-१' मधून अवकाशात पाठविण्यात आला. याशिवाय स्कायरूटच्या कर्मचारी, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि जगभरातील शुभेच्छुकांच्या हस्तलिखित संदेशांचाही या मोहिमेत समावेश करण्यात आला.

कंपनीच्या मते, ही स्मृतिचिन्हे भारतातील उदयोन्मुख खासगी अंतराळ परिसंस्थेमागील सामूहिक स्वप्न, नवकल्पना आणि पाठिंब्याचे प्रतीक आहेत.

भारताची अंतराळ क्षमता बळकट

'विक्रम-१' च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारतीय खासगी प्रक्षेपण कंपन्यांची क्षमता जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. यामुळे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारताची स्पर्धात्मक ताकद वाढण्यास मदत होईल आणि जागतिक अंतराळ उद्योगातील देशाचे स्थान आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in