नवी दिल्ली : भारत पाकिस्तान वादात चीन आणि तुर्कस्तानने भारताविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानला मदत तर केलीच पण आता सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवून भारतातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची दखल घेत भारत सरकारने चीन आणि तुर्कीशी संबंधित काही प्रमुख सरकारी माध्यम संस्थांच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील खात्यांवर कारवाई करत त्यांना देशात ब्लॉक केलं आहे. यामध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या खात्यांचा समावेश आहे. सरकारने ही कारवाई राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी केल्याचं स्पष्ट करत चीन आणि तुर्कीच्या भारताविरोधी प्रोपोगेंडा उघडकीस आणला आहे.
कोणती खाती झाली ब्लॉक?
या कारवाईत चीनच्या दोन प्रमुख सरकारी वृत्तसंस्था — ग्लोबल टाईम्स आणि शिन्हुआ न्यूज एजन्सी, तसेच तुर्की सरकारच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या टीआरटी वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेचा समावेश आहे.
भारतीय दूतावासाचा थेट इशारा
बीजिंगमधील भारतीय दूतावासाने ग्लोबल टाईम्सकडून पसरवण्यात आलेल्या बनावट माहितीचा निषेध करत थेट सोशल मीडियावर पोस्ट केली.
"प्रिय @globaltimesnews, कृपया चुकीची माहिती पसरवण्याआधी तथ्ये आणि तुमचे स्रोत तपासून घ्या," असं दूतावासाने म्हटलं.
यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं की, पाकिस्तान समर्थक अनेक सोशल मीडिया हँडल्स ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय लष्कराच्या कथित नुकसानीबाबत निराधार दावे करत आहेत. माध्यमांनी सत्यता न तपासता अशा प्रकारची माहिती शेअर करणं ही पत्रकारितेच्या नैतिकतेतील गंभीर चूक आहे," असेही सांगण्यात आले.
फॅक्ट चेक यंत्रणा सक्रिय
गेल्या काही दिवसांत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने सोशल मीडियावर सक्रिय होत खोट्या बातम्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. अनेक व्हिडीओ आणि फोटो हे जुन्या घटनांचे पुनर्वापर किंवा पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले.
एकंदरीत, भारताने केवळ भौगोलिक सीमाच नव्हे, तर डिजिटल सीमांचेही संरक्षण करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. खोटी माहिती, बनावट प्रचार आणि दिशाभूल करणार्या विदेशी माध्यम संस्थांवर ही कारवाई म्हणजे भारतीय सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी उचललेलं ठोस आणि निर्णायक पाऊल आहे.